स्वतंत्र सुभेदारीमुळे राष्ट्रवादीची पीछेहाट

By admin | Published: March 1, 2017 12:56 AM2017-03-01T00:56:27+5:302017-03-01T00:56:27+5:30

दहा टक्क्यांनी मतदानात घट : चार तालुक्यांतून ‘घड्याळ’ गायब; पक्षाच्या पुनर्बांधणीची गरज

NCP's backtrack is due to independent leadership | स्वतंत्र सुभेदारीमुळे राष्ट्रवादीची पीछेहाट

स्वतंत्र सुभेदारीमुळे राष्ट्रवादीची पीछेहाट

Next

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --नेत्यांच्या स्वतंत्र सुभेदारीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे. २०१२च्या जिल्हा परिषद निवडणुकीतील मतदानात तब्बल १० टक्क्यांची घट झाली असून, हातकणंगले, करवीर, चंदगड व गगनबावडा तालुक्यांतून पक्षाला एकही जागा निवडून आणता आलेली नाही. पक्षापेक्षा स्वत:ची सोय पाहिल्याने राष्ट्रवादीची बिकट अवस्था झाली आहे. नेत्यांनी आपल्या सुभेदाऱ्या व अंतर्गत कुरघोड्याच्या राजकारणाला मूठमाती दिली नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व अडचणीत येणार, हे मात्र निश्चित आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या पक्षाची सर्वांत मोठी पडझड झाली असेल तर ती राष्ट्रवादीची. पक्षातून दिग्गज नेते बाहेर पडले, तर काहींनी अलिप्त राहूनच निवडणूक लढविली. याचा फटका बसायचा तो बसलाच. याला सर्वस्वी सत्तेचे केंद्रीकरणच कारणीभूत आहे. मी आणि माझा तालुका एवढ्यापुरतेच नेत्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवले. प्रत्येकाने आपल्या सुभेदाऱ्या सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि पक्षातील गळतीकडे दुर्लक्ष केले. पक्षांतर्गत वाद मिटवून त्या गटाला सक्रिय करण्याऐवजी तो वाद धुमसतच ठेवल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाली.
जिल्हा परिषदेच्या २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पडलेली मते पाहिली, तर पक्ष कोणत्या दिशेने चाललाय, हे स्पष्ट होते. राष्ट्रवादीने २०१२ मध्ये २८.२९ टक्के मते घेत १६
जागा जिंकल्या होत्या. यावेळेला १८.२३ टक्केच मते मिळाली,
म्हणजेच १० टक्क्यांनी पक्षाचा जनाधार कमी झालाच; पण कशाबशा ११ जागा निवडून आल्या. ज्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करायची असेल, त्यांच्या ताब्यात हातकणंगले, करवीर हे दोन महत्त्वपूर्ण तालुके हवेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहिले तर हातकणंगले, करवीर, चंदगड व गगनबावडा तालुक्यांत एकही सदस्य निवडून आलेला नाही. शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा येथे प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीतील कामगिरीवरच विधानसभेची गणिते अवलंबून असतात. जिल्हा परिषद व विधानसभेला मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक पडत नाही. विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाचा लेखाजोखा मांडायचा म्हटला, तर राष्ट्रवादीसमोरील अडचणी दिसतात. सध्या हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर हे दोनच पक्षाचे आमदार आहेत. कागल, चंदगड, राधानगरी-भुदरगड व शिरोळ या चार मतदारसंघांतच राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसते. या मतदारसंघातील कामगिरी पाहिली तर कागलमध्ये पक्षाला ३९.५६ टक्के मते मिळाली. शिवसेनेपेक्षा एक टक्क्याने मते कमी असली तरी आगामी अडीच वर्षांत हसन मुश्रीफ गोळाबेरीज करू शकतात. चंदगड मतदारसंघात २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ४८.८९ टक्के मते मिळाली होती. त्यामध्ये २८ टक्क्यांची घट झाली आहे. राधानगरी-भुदरगडमध्ये गेल्या वेळेला ४५.६२ टक्के मतदान घेतले. आत्ता २७.३८ टक्के,तर शिरोळमध्ये गेल्या वेळेला १९.७२ आणि आता १३.१३ टक्के मते पक्षाच्या उमेदवारांना मिळाली. पक्षाच्या बालेकिल्ल्यात ही अवस्था असेल, तर इतर मतदारसंघात केविलवाणी अवस्था झाली आहे.
सध्या पक्षाचे दोन आमदार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीतील कामगिरी पाहता हसन मुश्रीफ,
ए. वाय. पाटील यांना आगामी अडीच वर्षांत केवळ ‘राष्ट्रवादी म्हणजे कागल-राधानगरी लिमिटेड’ ही ओळख पुसून इतर ठिकाणी पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. आगामी काळात भाजप अधिक आक्रमक होणार आहे. त्यांना तोंड देत पक्षातील कार्यकर्ते बांधून ठेवून त्यांना ताकद द्यावी लागणार ही जबाबदारी हसन मुश्रीफ व ए. वाय. पाटील यांना घ्यावी लागणार आहे.


हसन मुश्रीफ-धनंजय महाडिक मतभेद धोक्याचे
धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत ‘हाडाचे काडे व रक्ताचे पाणी’ करून निवडून आणल्याचे हसन मुश्रीफ नेहमी सांगत असतात; पण त्यांचा उपयोग पक्षवाढीसाठी का होत नाही. ‘दक्षिण’मधील आघाडी करण्यावरून मुश्रीफ आणि त्यांच्यात मतभेद झाले; पण त्यांनी उर्वरित मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांसाठी किती सभा घेतल्या, हे पाहणेही संशोधनाचे ठरणार आहे. आगामी काळात खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ या दोघांनी हातात हात घालून काम केले नाही, तर पक्षाच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह उभे राहील, असे कार्यकर्त्यांना वाटते.

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मतदानात १० टक्क्यांची घट झाली आहे. हातकणंगले, करवीर, चंदगड, गगनबावडा तालुक्यांतून एकही जागा मिळालेली नाही.

Web Title: NCP's backtrack is due to independent leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.