राष्ट्रवादीसमोर ‘गड’ राखण्याचे आव्हान : आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:02 PM2018-05-04T23:02:00+5:302018-05-04T23:02:00+5:30

NCP's challenge to keep 'Gad': 10 gram panchayat elections in Gadchiroli | राष्ट्रवादीसमोर ‘गड’ राखण्याचे आव्हान : आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

राष्ट्रवादीसमोर ‘गड’ राखण्याचे आव्हान : आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

Next
ठळक मुद्देथेट सरपंचपद निवडीमुळे पक्षीय लेबल

कृष्णा सावंत।
आजरा : आजरा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम जोरदारपणे वाजत असून या बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, बदलत्या राजकारणाचा विचार करता गड अबाधित राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर राहणार आहे.

तालुक्यातील पेरणोली, वेळवट्टी, चांदेवाडी, सुलगाव, देऊळवाडी, मसोली, विटे, हरपवडे, बुरूडे, मेंढोली या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका २८ मे रोजी होत आहेत. यापैकी बहुंताश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता अबाधित राखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर राहणार आहे.

जिल्हा बँक व आजरा साखर कारखाना निवडणुकीनंतर अशोक चराटी यांच्या गटाने प्रत्येक गावात आपला स्वतंत्र गट निर्माण केला आहे. चराटी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, विष्णूपंत केसरकर, सुधीर देसाई ही सर्व मंडळी एकत्र असल्याने गत पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे.

मात्र, एक वर्षापूर्वी अशोक चराटी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रत्येक गावातील स्थानिक गट आपोआपच भाजपकडे वळला. त्याचा फायदा आॅक्टोबरमध्ये झालेल्या ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला झाला. ३७ पैकी २० ग्रामपंचायतींमध्ये चराटी गटाच्या माध्यमातून भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेत प्रवेश करता आला. त्यामुळे २८ मे रोजी होणाऱ्या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पश्चिम भागातील पेरणोली, वेळवट्टी, मसोली, हरपवडे, चांदेवाडी, सुलगाव, विटे या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे, तर देऊळवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या निवडणुकीला महत्त्व असल्याने वरिष्ठ नेतेमंडळींकडून लक्ष घातले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांना महत्त्व आहे; परंतु सरपंचपदाची सरळ लढत होणार असल्याने अप्रत्यक्षपणे पक्षीय लेबल लागणार आहे.

पेरणोलीत बिनविरोधसाठी हालचाली
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाºया व मोठी ग्रामपंचायत असलेल्या पेरणोली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ५० वर्षांत प्रथमच जोरदारपणे हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु तरूणांना संधी देऊन लोकशाही पद्धतीने बिनविरोध करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

दुरंगी लढतीचे संकेत
हरपवडेतही बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू असून वेळवट्टी, मसोली, चांदेवाडी, सुलगाव, इटे, देऊळवाडी, बुरूडे, मेंढोली या गावांत दुरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

आजरा नगरपंचायतीचा परिणाम ?
नुकत्याच पार पडलेल्या आजरा नगरपंचायतीचा निकाल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर काय होतो याची उत्सुकता लागली आहे. चराटी गट व राष्ट्रवादी, शिवसेना, काँगे्रस यांच्यातच लढत होणार असल्याने नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी काय परिणाम होतो याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: NCP's challenge to keep 'Gad': 10 gram panchayat elections in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.