राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा, पण २०२४ मध्ये - सुनील तटकरे

By संदीप आडनाईक | Published: September 10, 2023 04:12 PM2023-09-10T16:12:11+5:302023-09-10T16:12:28+5:30

गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल असेही तटकरेंनी स्पष्ट केले.

NCP's claim for Chief Minister post, but in 2024 says Sunil Tatkare | राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा, पण २०२४ मध्ये - सुनील तटकरे

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा, पण २०२४ मध्ये - सुनील तटकरे

googlenewsNext

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदावर दावा जरुर आहे. त्यासाठी अजितदादा योग्य नेतृत्व आहेत. परंतु राज्यात महायुतीत आणि देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षाचा मुख्यमंत्री २०२४ च्या निवडणुकीत होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे केला. गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेसाठी कोल्हापूरात आलेल्या तटकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत ते म्हणाले, ज्याचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री हे स्पष्ट आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेचीच इच्छा आहे. पण पक्ष वास्तववादी विचार करतो. आम्ही महायुतीत आणि एनडीएचा भाग आहोत. त्यामुळे समान कार्यक्रमावर आमचा विश्वास आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त आमदार येण्यासाठी प्रयत्न करु. जनतेने संधी दिली तर पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.

शरद पवार यांच्या सभा झाल्या तेथेच राष्ट्रवादी सभा घेत आहे, हे उत्तर आहे का यावर तटकरे यांनी आम्ही फक्त उत्तरदायित्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सभा घेत आहोत, असे स्पष्ट केले. राज्य प्रगतीपथावर न्यावे, देशातील सर्वोत्तम विकसित राज्य व्हावे, या विचारातून शाहु, फुले आणि आंबेडकर या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांशी फारकत न घेता राज्य आणि केंद्रात एकविचाराचे सरकार असावे या हेतूने महायुतीत राष्ट्रवादी पक्ष सहभागी झाला आहे. हा मोठा राजकीय निर्णय जनतेपर्यंत पोहाचिवण्यासाठी प्रादेशिक भागात जाण्याचा निर्णय घेतल्याने या सभा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आणि राज्य घटनेतील कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करुनच आम्ही राजकीय पक्षाची भूमिका घेतली आहे. निवडणुक आयोगाला न्यायालयाने स्वायत्ततता दिली आहे. त्यांची कार्यकक्षा गुणवत्तेवर आधारीत आहे. आयोग आमच्याच भूमिकेला पाठिंबा देईल अशी आमची खात्री आहे, असे एका प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले.

गणेशोत्सवापूर्वी विस्तार, पालकमंत्रीपद
पक्षाच्या सर्वच मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल. हे महायुतीत सहभागी झालाे, त्याचवेळी ठरले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्री नियुक्त होतील, असेही तटकरे यांनी जाहीर केले.

मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण वेळ द्या
मराठा आरक्षण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. मीही ओबीसीच आहे, परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकावे आणि निर्णयप्रक्रिया कायदेशीर व्हावी यासाठी लागणारा वेळ सरकारला दिला पाहिजे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे जरंगे यांनी तितका वेळ द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: NCP's claim for Chief Minister post, but in 2024 says Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.