राष्ट्रवादी काँग्रेसमधील शीतयुद्ध पुन्हा चव्हाट्यावर
By admin | Published: September 20, 2016 12:34 AM2016-09-20T00:34:57+5:302016-09-20T00:44:45+5:30
कार्यकर्त्यांत अस्वस्थता : धनंजय महाडिक यांंच्या ‘टॉप थ्री’चे पक्षाला कौतुक नाही
कोल्हापूर : गेल्या दीड-दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध चव्हाट्यावर आले आहे. नेत्यांमध्ये सरळसरळ दोन गट पडले असून, पक्षाच्या कार्यक्रमाला एकमेकांना डावलले जात असल्याने कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या सत्काराला त्याच पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी अनुपस्थित राहणे हे त्याच शीतयुद्धाचा भाग आहे.
सर्वच राजकीय पक्षांना अंतर्गत कुरघोड्या काही नवीन नाहीत; पण त्या मर्यादित ठेवल्या तरच बरे, अन्यथा त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते, हा इतिहास आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच नेते ताकदीने बाहेर पडल्याने देशातील लाट कोल्हापुरात परतवून लावण्याची किमया झाली. आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते झपाटल्यासारखे राबले आणि यश मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या वाढत गेल्या. महापालिका निवडणुकीत तर खासदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यातील मतभेद टोकाला गेले. ते कमी की काय, तोपर्यंत शहरात दोन गट झाले. त्यानंतर एकमेकांना डावलण्याचे राजकारण सुरू झाले. त्यातूनच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झालेल्या ‘युथ केडर’च्या कार्यक्रमाला जिल्हा नेतृत्वाने काही नेत्यांना उशिरा निमंत्रण दिले. त्यामुळे या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पक्षांतर्गत शीतयुद्ध प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर त्यांनी अनुपस्थित नेत्यांना फोन करून चौकशी केली.
इचलकरंजीतील राजकारणात जिल्हा नेतृत्वाने हस्तक्षेप केला. त्यातून उठलेले वादंग अजून शांत व्हायचे आहे, तोपर्यंत रविवारी नितीन पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची ठिणगी पडली. पाटील यांनी ‘टॉप थ्री’ सन्मान झाल्याबद्दल खासदार महाडिक, तर ‘कागल’ व ‘मुरगूड’ नगरपालिका देशात आदर्श ठरल्याबद्दल आमदार मुश्रीफ यांचा सत्कार ठेवला होता. यासाठी राष्ट्रवादीच्या शहर व जिल्हा नेत्यांना बोलविले होते; पण कोल्हापुरात असताना मुश्रीफ यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. एवढेच नव्हे, तर शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही दांडी मारली. यामुळे संतप्त झालेल्या नितीन पाटील यांनी थेट निषेध नोंदवत संताप व्यक्त
केला.
ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील शीतयुद्धाने उसळी घेतल्याने पक्षाचे नुकसान होणार हे निश्चित आहे. मुळात तीन तालुक्यांचा पक्ष म्हणून विरोधक राष्ट्रवादीला हिणवत असताना नेते मात्र एकमेकाचा काटा काढण्यातच मग्न असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
अंहं...कागल-मुरगूड देशात पुढे
कागल-मुरगूड नगरपालिका स्वच्छतेत देशात पहिल्या आल्यावर
अंहं...कागल-मुरगूड नगरपालिका देशात पुढे म्हणून आमदार मुश्रीफ यांचे कौतुक करणारे डिजिटल फलक शहरभर लागले. परंतु, त्याच पक्षाचे खासदार ‘टॉप थ्री’मध्ये आलेल्याचे मात्र पक्षाला कौतुक नाही. उलट पक्षाचेच नेते खासगीत त्याबद्दल कुचेष्टेने बोलतात. खासदार झाल्यावर संभाजीराजे यांचा महिन्यात सर्वपक्षीय नागरी सत्कार झाला; परंतु महाडिक यांचा मात्र तसा गौरव होऊ शकला नाही, यामागेही हा पक्षांतर्गत वादच कारणीभूत आहे.