करवीरमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात?

By admin | Published: February 10, 2017 12:19 AM2017-02-10T00:19:24+5:302017-02-10T00:19:24+5:30

जिल्हा परिषदेसाठी केवळ चार उमेदवार : पंचायत समितीला २२ पैकी ८ उमेदवार

NCP's existence in the threat of Karveer? | करवीरमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात?

करवीरमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात?

Next

प्रकाश पाटील-- कोपार्डे --राज्याचे नेतृत्व करण्याची धमक माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी आपल्या कर्तृत्वावर निर्माण केली होती. त्या खानविलकरांच्या एक्झिटनंतर करवीर तालुक्यात ‘राष्ट्रवादी’ची मोठी वाताहत झाली असून ‘राष्ट्रवादी’चा रिमोट कंट्रोल आता कागल, राधानगरीत गेल्याने करवीरमधील एकाही राष्ट्रवादी कार्यकर्त्याला मानाचे पद मिळेनासे झाल्याने सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांनी एक तर शिवसेनेची कास पकडली आहे अथवा गप्प बसणे पसंद केले आहे. त्यामुळे करवीरमधील ‘राष्ट्रवादी’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२००४ मध्ये ‘राष्ट्रवादी’चा आधारस्तंभ असलेले मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा आश्चर्यजनक पराभव माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. यानंतर करवीर तालुक्यातून राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली. सतेज पाटील यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून येथे कॉँग्रेसला बळकटी देण्याचे काम केले. यानंतर भौगोलिक व लोकसंख्येच्या आधारावर करवीर मतदारसंघाचे विभाजन झाले. कोल्हापूर दक्षिण व करवीर असे दोन मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर २००९च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी दिग्विजय खानविलकर यांना करवीर मतदारसंघ सुरक्षित होता; पण पराभवाचा वचपा काढण्याच्या ईर्ष्येने त्यांनी सतेज पाटील यांच्या विरोधात दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला; पण येथे त्यांची डिपॉझिट जप्त झाली. या धसक्याने त्यांना उभारी घेताच आली नाही आणि त्यातच त्यांचा अकाली मृत्यू झाला.
१५ फेब्रुवारीला त्यांचा स्मृतिदिन असून, आज ज्या करवीरची दिग्विजय खानविलकरांच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करण्याची प्रतिमा निर्माण झाली होती तेथेच ‘राष्ट्रवादी’ची वाताहत झाल्याचे चित्र आहे. दक्षिणमधून खानविलकर यांनी निवडणूक लढवून पराभूत झाल्यानंतर त्यांची जशी राजकारणातून दुर्दैवी एक्झिट झाली. तशी कार्यकर्त्यांनीही नेता शोधण्यास सुरुवात केली. २००९च्या निवडणुकीत ‘कुंभी’चे अध्यक्ष आ. चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविताच ताकदीचा व जवळचा नेता म्हणून तळातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसऐवजी शिवसेना जवळ करणे पसंत केले आणि येथेच राष्ट्रवादी विस्कळीत झाली. आॅक्टोबर २०१५च्या विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नसल्याने राष्ट्रवादीचे अस्तित्वच धोक्यात आले. याचवेळी आ. हसन मुश्रीफ, के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कागल, राधानगरीतील कार्यकर्त्यांना शिखर संस्थांतील अनेक पदावर विराजमान केले. मात्र,करवीरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गळचेपी झाली. यामुळे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीपासून फारकत घेऊ लागले. त्यांना पक्षाची ताकद मिळेना. नेत्यांच्या संधिसाधू युतीमुळे कार्यकर्ते उघडे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


राष्ट्रवादीचा बोलकिल्ला म्हणून ज्या करवीर तालुक्याची गणना होत होती, तेथे जिल्हा परिषदेचे ११ गट असताना केवळ चारच उमेदवार उभा करता आले आहेत, तर २२ पंचायत समिती गणांपैकी आठच ठिकाणी उमेदवार उभा आहेत.


दिग्विजय खानविलकर यांच्यानंतर करवीरमध्ये
मोठी पडझड
कागल, राधानगरीत रिमोट कंट्रोल गेल्याने करवीरमधील नेत्यांना संधीच नाही.

Web Title: NCP's existence in the threat of Karveer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.