राष्ट्रवादीतील निष्ठावंत कुणामुळे दूर गेले..?

By admin | Published: March 1, 2017 12:50 AM2017-03-01T00:50:57+5:302017-03-01T00:50:57+5:30

धनंजय महाडिक; हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य गैरसमजातून

NCP's loyal person went away ..? | राष्ट्रवादीतील निष्ठावंत कुणामुळे दूर गेले..?

राष्ट्रवादीतील निष्ठावंत कुणामुळे दूर गेले..?

Next

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, अशोक जांभळे, धैर्यशील माने, मानसिंग गायकवाड यांच्यासह अनेक निष्ठावंत नेते कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले. ही वेळ त्यांच्यावर कुणी आणि का आणली, अशी विचारणा खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार समारंभात मुश्रीफ यांनी ‘महाडिक यांना पक्षात राहायचे आहे की नाही हे एकदा ठरवावे,’ अशी टीका केली होती. त्यास महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले; परंतु त्यांची भाषा मवाळ असून मुश्रीफसाहेब हेच आपल्याला आदरणीय असून त्यांनी गैरसमजातून असे वक्तव्य केले असल्याचे म्हटले आहे.
महाडिक म्हणतात, ‘कार्यकर्त्यांची कदर करणारा’ अशीच माझी ओळख आहे. मी राष्ट्रवादी पक्षाचाच खासदार आहे. या पक्षाचे जिल्ह्यातील ‘सर्वेसर्वा’ आमदार मुश्रीफ यांच्या वक्तव्यामुळे कमालीच्या वेदना झाल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत मी कुठेही काम केलेले नाही. आमदार मुश्रीफ यांचा गैरसमज झाला असून ‘भाबडे’पणाने त्यांनी ते विधान केले असावे. लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ असतानाही कोल्हापूरच्या जनतेने मला निवडून दिले याची जाणीव ठेवून मी पदाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवार उभे करून पक्षाची वाढ करण्याचे नियोजन केले होते. मात्र, मुश्रीफ यांनी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने मी अलिप्त राहिलो. दुसरीकडे श्रीमती निवेदिता माने, कुपेकर यांच्यासारखे निष्ठावंत पक्षापासून का दूर गेले याच्या खोलात मी जात नाही परंतु त्याची मला खंत वाटते.


भूमिकेत बदल..
नगरपालिका निवडणुकीत तालुकानिहाय वेगवेगळी समीकरणे आकारास आली. कागल तालुक्यातील राजकीय समीकरणांबाबत मी कधीही प्रश्न उपस्थित केलेला नाही आणि माझा तो अधिकारही नाही. तथापि, आमदार मुश्रीफ हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असून पक्षाच्या विरोधात कोणतीही कृती माझ्याकडून झालेली नाही. त्यामुळे मी पक्षात राहणार की नाही, हा प्रश्नच येत नाही व मुश्रीफसाहेब यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे महाडिक यांनी म्हटले आहे. महाडिक यांनी २१ जानेवारीस प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कागलमध्ये मुश्रीफ यांना शिवसेनेशी संगत कशी चालते, अशी विचारणा केली होती; परंतु पक्षात राहून त्यांना इतक्या लवकर आव्हान द्यायला नको म्हणून हा माझा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यांच्यामुळे झाला विजय
लोकसभा निवडणुकीतील माझ्या यशामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस, जनसुराज्य, आरपीआय, धनंजय महाडिक युवाशक्ती, ‘गोकुळ’चे सभासद, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेने भरभरून मतदान केल्याने मी निवडून आलो, असे खासदार महाडिक यांनी म्हटले आहे.

Web Title: NCP's loyal person went away ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.