जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By admin | Published: January 30, 2015 11:23 PM2015-01-30T23:23:14+5:302015-01-30T23:36:39+5:30
मूक व आत्मक्लेषाने विरोध : गोडसेचे भाजपकडून उदात्तीकरण : मुश्रीफ
गडहिंग्लज/ जयसिंगपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या केलेल्या माथेफिरू नथुराम गोडसेचे उदात्तीकरण भाजप सरकार करीत आहे. त्यामुळेच गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करण्याचे धाडस जातीवादी शक्ती करीत आहेत, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी आज, शुक्रवारी केला. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील प्रांतकचेरीसमोर राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे तोंडाला काळ््या पट्ट्या बांधून आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुश्रीफ म्हणाले, संपूर्ण देश महात्मा गांधीजींच्या विचाराने वाटचाल करीत असताना भाजप सरकार नेमकी उलटी भूमिका घेत आहे, ही दुर्दैवी व निषेधार्ह बाब आहे. गांधीजींच्या विचारांची अवलेहना करणाऱ्यांचा सध्या उदोउदो केला जात असून हे निषेधार्ह आहे. भाजप सरकारची ‘अच्छे दिना’ची घोषणा हवेतच विरली असून केशरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. त्याविरोधातदेखील राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार आहे. याबद्दलचे निवेदन ३ फेब्रुवारीला तहसीलदारांना देण्यात येणार आहे, असेही मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केले.
आंदोलनात आमदार संध्यादेवी कुपेकर, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, जि. प.च्या सदस्या शैलजा पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष वसंत यमगेकर, कार्याध्यक्ष प्रा. रमेश पाटील, नगरसेवक रामदास कुराडे, किरण कदम, हारूण सय्यद, मंजूषा कदम, अरुणा शिंदे, सरिता
गुरव, बड्याचीवाडी सरपंच गीता देसाई, शारदा आजरी, हरिभाऊ चव्हाण, सतीश पाटील, रामराजे कुपेकर, बाळासाहेब घुगरे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जयसिंगपुरात मूक आंदोलन महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे भाजप सरकार उदात्तीकरण करीत आहे. या उदात्तीकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी जयसिंगपुरात आज, शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने मूक आंदोलन करण्यात आले.
नथुराम गोडसे याचे भाजप सरकार उदात्तीकरण करीत असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यभर मूक आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचाच भाग म्हणून आज सकाळी येथील नगरपालिकेच्या राजर्षी शाहू खुल्या नाट्यगृहात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर तोंडावर काळ्या फिती लावून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले.
आंदोलनात प्रा. आण्णासो क्वाणे, संजय नांदणे, महिला राष्ट्रवादी कॉँग्रेस शहराध्यक्षा सावित्री कुंभार, शहराध्यक्ष संभाजी मोरे, युवकचे शहराध्यक्ष रामदास धनवडे, बबन यादव, संतोष खरात, अर्जुन देशमुख, प्रकाश लठ्ठे, अजय पाटील, सुदर्शन सांगले, आप्पासाहेब निशान्नावर, मुनिर शेख, सुनील कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कागल येथील गैबी चौकात मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी-म्हाकवेकर, भैया माने, युवराज पाटील, नगराध्यक्षा आशाकाकी माने, विकास पाटील-कुरुकलीकर, प्रकाश गाडेकर, दलितमित्र डी. डी. चौगुले, संजय हेगडे, प्रगतशील शेतकरी एम. आर. चौगले, रमेश माळी, आदी प्रमुखांसह सुमारे ४०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.