‘दक्षिण’मध्ये राष्ट्रवादीचाच प्रचार
By admin | Published: September 29, 2014 01:01 AM2014-09-29T01:01:20+5:302014-09-29T01:16:02+5:30
धनंजय महाडिक : आघाडी तुटल्याने धर्मसंकट उभारल्याची कबुली
कोल्हापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार दुर्वास कदम यांचाच प्रचार करणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने आपल्यासमोर धर्मसंकट उभे राहिल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार महाडिक म्हणाले, गेल्या १५ वर्षांची दोन्ही कॉँग्रेसची आघाडी तुटली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष स्वतंत्र लढत आहेत. लोकसभा निवडणूक दोन्ही कॉँग्रेसने एकसंधपणे लढली होती. आता स्वतंत्र लढत असल्याने आपल्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने दुर्वास कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कदम यांच्याबरोबरच आपण राहणार आहे. आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसवर परिणाम होईल, असे वाटत नसल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले.
अमल महाडिक हे माझे चुलत बंधू जरी असले, तरी त्यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे. आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांची व माझी वेगळी भूमिका असू शकते, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.
आबिटकर... आव्हान नव्हेच
शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तिप्रदर्शनाबाबत विचारणा केली असता, तुम्ही माझे शक्तिप्रदर्शन पाहिले नसल्याने असे विचारत आहात. आबिटकरांचे विचाराल तर ते माझ्यासमोर आव्हान नाहीत, अशी खिल्ली आमदार के. पी. पाटील यांनी उडविली.