राष्ट्रवादीची भूमिका लवकरच ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2015 12:36 AM2015-12-05T00:36:16+5:302015-12-05T00:43:28+5:30

महापालिका : १७ रोजी काँग्रेसची बैठक शक्य

NCP's role will soon be decided | राष्ट्रवादीची भूमिका लवकरच ठरणार

राष्ट्रवादीची भूमिका लवकरच ठरणार

Next

सांगली : काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिकेत निर्माण झालेला राजकीय पेच सोडविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. येत्या डिसेंबरअखेरीपर्यंत राष्ट्रवादीची भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच आ. पतंगराव कदम व विश्वजित कदमही नगरसेवकांना एकसंध करण्यासाठी बैठक घेणार आहेत. ही बैठक १७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी सांगितले.
महापालिकेत मदन पाटील यांचा गट सर्वात मोठा आहे. आजअखेर याच गटाकडे पालिकेची सूत्रे राहिली आहेत. महापौर पदापासून ते अगदी सभापती पदापर्यंत सर्व पदे मदनभाऊ गटाकडे आहेत. पण त्यांच्या निधनाने पालिकेतील राजकारण बदलले आहे. गेल्या वर्षभरात मदनभाऊ व राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यात सूर जुळले होते. जयंतरावांनीही मदनभाऊ गटाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीच्या निर्णयात आपला सहभाग असेल, असे जाहीरपणे सांगितले होते. मदनभाऊ गटानेही जयंतरावांशी राजकीय वैर विसरून एकत्र येण्याची मानसिक तयारी चालविली आहे. त्याला काहींचा विरोध आहे.
या घडामोडीतच आता पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनीही उडी घेतली आहे. कदम पिता-पुत्रानी पालिकेवरील काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पतंगरावांनीही वेळप्रसंगी जयंतरावांना सोबत घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे पुढील महिन्याभरात पालिकेतील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणून काम करीत आहे. हीच भूमिका कायम ठेवून मदनभाऊ गटाला सहकार्य करण्यात येणार आहे. मध्यंतरी जयंतराव पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात बैठक होणार असल्याची चर्चा होती. पण आतापर्यंत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. राष्ट्रवादीकडून डिसेंबरअखेरपर्यंत भूमिका स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनी काँग्रेस नगरसेवकांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पतंगरावांनी हिवाळी अधिवेशनानंतर नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी महापौरांच्या फार्म हाऊसवर बैठक होण्याची शक्यता आहे. महापौर विवेक कांबळे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)


कदमांनी कंबर कसली
या घडामोडीतच आता पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनीही उडी घेतली आहे. कदम पिता-पुत्रानी पालिकेवरील काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पतंगरावांनीही वेळप्रसंगी जयंतरावांना सोबत घेण्याची तयारी चालविली आहे.

Web Title: NCP's role will soon be decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.