सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचीच हुकुमत--३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 11:35 PM2017-02-23T23:35:35+5:302017-02-23T23:35:35+5:30

.. काँग्रेसची लागली पुरती वाट...भाजपची मात्र ७ ठिकाणी मुसंडी पाटील पुत्र अन् शिंदे बंधूंचा पराभव

NCP's ruling in Satara district - clear majority winning by 39 seats. | सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचीच हुकुमत--३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचीच हुकुमत--३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत.

Next

सातारा : गेल्या दीड दशकापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपली हुकूमत सिद्ध केली. ६४ पैकी तब्बल ३९ जागा जिंकून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळविले. या निवडणुकीत सर्वांत मोठा फटका काँग्रेसला बसला असून, भाजपने मात्र सात ठिकाणी आपले खाते खोलले आहे. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीला मात्र तीन जागांवर समाधान मानावे लागले असून, शिवसेना दोन ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकली.
या निवडणुकीत किंगमेकर म्हणून वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात नऊपैकी सात जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. सातारा तालुक्यात दहापैकी पाच जागांवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यश मिळविले असून, कोरेगावातही आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा एकदा मान्यता दिली आहे. येथे चार ठिकाणी घड्याळाचा गजर झाला.
खटाव तालुक्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या पत्नीला पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला असून, माण तालुक्यात शेखर गोरे यांनी तीन ठिकाणी चमत्कार घडवून राष्ट्रवादीला घवघवीत यश प्राप्त करून दिले आहे. फलटणमध्ये पुन्हा एकदा ‘रामराज्य’च असल्याचे सिद्ध झाले असून, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे दावेदार असलेले संजीवराजे नाईक-निंबाळकर निवडून आले आहेत. काँग्रेसचे प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या सुपुत्राला घरच्या मतदारसंघात धक्का बसला आहे. कऱ्हाड तालुक्यात माजी आमदार विलासराव उंडाळकर गटाने आपली शक्ती शाबूत असल्याचे सिद्ध केले असून, अतुल भोसले यांच्या भाजपने कऱ्हाडात प्रथमच खाते खोलले आहे. काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांच्या चिरंजीवाला मात्र पराभवाची चव चाखावी लागली आहे. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांचाही पराभव झाला आहे.


दहा तालुक्यांत घड्याळच...
कऱ्हाड वगळता दहा पंचायत समितींवर राष्ट्रवादीचीच निर्विवाद सत्ता
सातारा : एकाच वेळी तीन पक्षांसह खासदारांशी संघर्ष करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जिल्ह्यातील अकरांपैकी तब्बल दहा पंचायत समितींमध्ये निर्विवाद यश मिळविले आहे. कऱ्हाडात मात्र कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्या ठिकाणी सत्तेची खिचडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा तालुक्यात २० पैकी अकरा जागांवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यश मिळाले असून, जावळी तालुक्यात तर सहाच्या सहा जागा राष्ट्रवादीनेच पटकाविल्या आहेत. वाई, महाबळेश्वर अ्न खंडाळा पंचायत समितीतही आमदार मकरंद पाटील गटाने करिष्मा दाखविला असून, यंदा प्रथमच तिन्ही ठिकाणी स्पष्ट बहुमत राष्ट्रवादीला मिळाले आहे. फलटण पंचायत समितीमध्येही ‘रामराजे बोले... तालुका हाले’ हीच परिस्थिती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्यावेळी चिठ्ठीवर सभापती निवडणाऱ्या माण पंचायत समितीत यंदा मात्र राष्ट्रवादी अन् रासप युतीला बहुमत मिळाले आहे. खटाव तालुक्यातही बारापैकी आठ ठिकाणी विजय संपादन करून राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आहे.
कोरेगाव तालुक्यातही आमदार शशिकांत शिंदे यांनी निर्विवाद सत्ता मिळविली असून, विरोधकांचे पूर्ण पानिपत करण्यात त्यांना प्रथमच यश आले आहे. तसेच पाटण तालुक्यात मात्र माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर गटाला थोडक्यात बहुमत मिळाले असून, आमदार शंभूराज देसाई गट सत्तेपासून दूर राहिला आहे.


कऱ्हाड पंचायत समितीतील सत्तेचं त्रांगडं भलतंच वाढलं असून, खिचडीशिवाय पर्याय राहिला नाही. राष्ट्रवादी सात, उंडाळकर गट सात, भाजप सहा अन् काँग्रेस चार अशी सदस्य संख्या पुढील पाच वर्षे राहणार आहे.

Web Title: NCP's ruling in Satara district - clear majority winning by 39 seats.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.