‘सोयीच्या राजकारणा’ने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता
By admin | Published: January 18, 2016 12:59 AM2016-01-18T00:59:06+5:302016-01-18T01:02:43+5:30
बगलबच्च्यांनाच पदांचे वाटप : संख्याबळ पाहता सत्तेची नुसती ‘फूग’च
कोल्हापूर : स्थानिक नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत ‘सोयीची भूमिका’ घेत आपल्या बगलबच्च्यांना संधी देण्याचा सपाटा लावल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. जिल्हा बँक, बाजार समिती, महापालिकेवरील सत्तेचा दावा जरी नेते करत असले तरी त्यातील तुलनात्मक संख्याबळ पाहता राष्ट्रवादीच्या सत्तेची फूग उघड होते.
कोल्हापूर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाते व प्रेम सर्वश्रुत आहे. जिल्ह्णातील सामान्य जनतेनेही हे प्रेम कधी कमी पडू दिले नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर उभा जिल्हा शरद पवार यांच्या मागे उभा राहिला. जिल्ह्णातील सर्व संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर, निवेदिता माने अशा दिग्गज नेत्यांची फळी पक्षाकडे असल्याने कोणत्याही निवडणुकीचे आव्हान सहज परतवून लावण्याची कसब या नेत्यांकडे होती पण सत्तेची ऊब जास्त काळ राहिली, तसे पक्षातंर्गत कुरघोड्यांनी डोके वर काढले. त्यातूनच एक-एक घराणे, नेते पक्षातून बाजूला गेले. प्रत्येक निवडणुकीत नेत्यांनी ‘सोयीची भूमिका’ घेतल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना पक्षात आहे. कोल्हापूर शहरासह इतर पदाधिकारी निवडताना आपल्याच बगलबच्च्यांना संधी दिल्याचा थेट आरोप नेत्यांवर होत आहे. त्यातूनच शहर राष्ट्रवादीअंतर्गत खदखद वाढली आहे. चार दिवसांपूर्वी पन्हाळगडावर राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यात तर कार्यकर्त्यांनी नेत्यांवरच हल्ला चढविला. जिल्हा बँकेत दोन ‘स्वीकृत सदस्य’ निवडीत ही ज्या तालुक्यात प्रतिनिधीत्व नाही, तेथील कार्यकर्त्यांना बळ देणे अपेक्षित होते पण तसे न करता जनसुराज्य पक्षाचे प्रा. जयंत पाटील व आसिफ फरास यांना ‘स्वीकृत’ म्हणून संधी दिली. महापालिका ‘स्वीकृत नगरसेवक’ नियुक्त करतानाही आमदार मुश्रीफ यांनी जे करायचे तेच केले. जिल्हा बँकेत स्वीकृत म्हणून घेतलेल्या प्रा. जयंत पाटील यांना महापालिकेतही ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी दिली. त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. एका बाजूला खासदार धनंजय महाडिक पक्षापासून दूर चालले आहेत, त्यात नेतेच जर कार्यकर्त्यांना बळ देणार नसतील तर पक्षात राहून काय उपयोग, अशी भावना प्रामाणिक कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यातूनच पक्षांतर्गत राजीनामा नाट्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
मागील दहा वर्षांत जिल्हा बॅँक, बाजार समितीसह महापालिकेत निर्विवाद बहुमत होते; पण सध्याची जिल्हा बँकेतील बलाबल पाहिले तर पक्षाचे २१ पैकी सातच संचालक आहेत.
बाजार समिती १९ पैकी ८ सदस्य तर महापालिकेत ८१ पैकी १५ नगरसेवक आहेत. मागील सभागृहात जिल्हा बँकेत १५, बाजार समितीत ११ सदस्य तर महापालिकेत २५ नगरसेवक होते. तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीची सत्तेची फूग दिसून येते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले, गगनबावडा, चंदगड या तालुक्यांत राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसत नाही. नेत्यांनी ‘सोयीची भूमिका’ सोडून कार्यकर्त्यांना बळ दिले नाही तर महापालिकेपेक्षा वेगळा निकाल लागेल असे वाटत नाही.