प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 05:17 PM2022-01-19T17:17:26+5:302022-01-19T17:20:34+5:30
माई सांगत होत्या, या घरांत माझ्या दृष्टीने तीनच गोष्टी मोलाच्या होत्या. त्यातील माझा माणूस होता, तो निघून गेला. आता राहिले काय, तर पुस्तके आणि पुरस्कार.
विश्वास पाटील
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना त्यांच्या अंतिम इच्छेनुसार शिवाजी विद्यापीठाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. त्यांच्या पत्नी सरोज ऊर्फ माई पाटील यांनीच मंगळवारी ही गोष्ट स्पष्ट केली. त्यांचा अर्थकारण व समाजकारणाचा विशेष अभ्यास होता. त्यामुळे त्यासंबंधीचे नवीन ग्रंथ आणून ते वाचत होते. हा सगळा साहित्य खजिना संग्रहालयरूपात जतन करण्यासारखा आहे. तो कॉलेजपेक्षा विद्यापीठाकडे गेल्यास तो विविध विद्या शाखांतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल, अशी त्यामागील धारणा आहे.
माई सांगत होत्या, या घरांत माझ्या दृष्टीने तीनच गोष्टी मोलाच्या होत्या. त्यातील माझा माणूस होता, तो निघून गेला. आता राहिले काय, तर पुस्तके आणि पुरस्कार. माझ्या घरी कुणी इन्कम टॅक्सवाला धाड टाकायला आला, तर त्याला पुस्तकाशिवाय दुसरं काही मिळणार नाही, असेही कधीतरी प्रा. पाटील गमतीने म्हणायचे. हे सगळे संचित आता नव्या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची गाथा सांगत राहील.
पवार यांच्या घरी किमान चार हजारांहून जास्त पुस्तकांचे ग्रंथालय आहे. माझ्या मृत्यूनंतर हा ज्ञानाचा खजिना घरी ठेवू नकोस, तो समाजाच्या उपयोगीच आला पाहिजे, असे प्रा. पाटील यांनी बजावून ठेवले होते. त्यानुसार ही त्यांची खरी संपत्ती समाजासाठीच दिली जाणार आहे. रुईकर कॉलनीतील घरांतील दिवाणखान्यात पूर्वेकडील बाजूला भलेमोठे कपाट आहे. त्यामध्ये महत्त्वाची पुस्तके, प्रा. पाटील यांना मिळालेली मानपत्रे, सन्मानचिन्हे, डी.लिट. ठेवली आहेत. त्याकडे पाहिले की, प्रा. पाटील यांच्या विद्वत्तेची उंची लक्षात येई.
विश्रांतीच्या खोलीत ते कायमपणे काही ना काही वाचत बसलेले असत. सहकारी साखर कारखाने फुकापासरी विक्रीला काढून तेच कारखाने काही राजकीय नेत्यांनी स्वस्तात घशात घातल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावर त्यांनी राज्यातील अशा सर्व कारखान्यांची माहिती मिळवली होती. सांगली जिल्ह्यातील तासगाव कारखान्याच्या खासगीकरणाविरोधात तर त्यांनी तेथील स्थानिक नेतृत्वाची दहशत मोडून लढा उभारला होता. अशा लढ्यावेळी ते त्या कारखान्याच्या महत्त्वपूर्ण माहितीचे टिपण काढत असत, अशी अनेक प्रश्नांतील महत्त्वाची कागदपत्रेही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.