एनडीए, इंडियाकडून अपेक्षाभंग; चंद्रशेखर राव यांचे टीकास्त्र
By समीर देशपांडे | Published: August 1, 2023 07:32 PM2023-08-01T19:32:48+5:302023-08-01T19:33:51+5:30
कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले ...
कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले हे आपण पाहतो आहोत. त्यामुळेच आम्ही या दोघांकडेही नाही. काही मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार महाराष्ट्रात संघटना बांधणीकडे आम्ही विशेष लक्ष देत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
येथील छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी वंदन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र ही अदभूत भूमी आहे. परंतू पैठणसारखा प्रकल्प असूनही औरंगाबादला दहा दिवसांनी पाणी येते. तेथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत एक अहवाल दिला आहे. यावर उपाय म्हणून तेलंगणा मॉडेलची अंमलबजावणी आवश्यक आहे. परंतू या सरकारने विधानसभेत हे मॉडेल स्वीकारणार नाही असे सांगितले. याला आता काय म्हणायचे.
महाराष्ट्रात आल्यानंतर मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. परंतू शरद पवार यांनीच आम्हाला भाजपची बी टीम म्हटले. आता शरद पवारांनीच कॉंग्रेस फोडली. आता त्यांचाही पक्ष फुटला. शिवसेना फुटली, कॉंग्रेसही फुटणार असे ऐकत आहे. आणखी किती तुकडे होणार आहेत माहिती नाहीत. आम्हाला बी टीम म्हणणारे आता भाजपमध्ये घुसलेत.
तत्पूर्वी राव यांचे सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर वाटेगावहून परत येवून त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले.