‘एनडीआरएफ’ने वाचविले पूरग्रस्तांचे जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:17+5:302021-07-27T04:25:17+5:30
कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या जोरदार पावसाने कोल्हापुरात महापूर आला. त्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सने ...
कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या जोरदार पावसाने कोल्हापुरात महापूर आला. त्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सने (एनडीआरएफ) बचाव आणि मदतकार्य करत पूरग्रस्तांचे जीव वाचविले. ‘एनडीआरएफ’च्या सहा पथकांनी गेल्या चार दिवसांत एक हजार पूरग्रस्तांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण केले.
जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला. महापुराची स्थिती निर्माण होऊ लागली. त्यावर पुणे येथून गुरुवारी ‘एनडीआरएफ’ची दोन पथके कोल्हापूरमध्ये दाखल झाली. त्यांनी आंबेवाडी, प्रयागचिखली या परिसरात मदतकार्य सुरू केले. त्यानंतर शुक्रवारी गांधीनगर (गुजरात) येथून ‘एनडीआरएफ’ची आणखी चार पथके आली. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूरबाधित परिसरामध्ये मदतकार्य सुरू झाले. या सहा पथकांच्या माध्यमातून एकूण १८० जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावत बोटींच्या माध्यमातून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी सुखरूपपणे स्थलांतरित केले. त्यामध्ये वृद्ध, गरोदर महिला, लहान मुले, जनावरे आदींचा समावेश होता. पूरग्रस्तांना स्थलांतरित करताना या जवानांकडून केवळ एक काम म्हणून नव्हे, तर आपुलकीसह बोटीतून लोकांना नेताना त्यांची भीती दूर करण्यासह त्यांच्यात धैर्य निर्माण केले जात होते.
चौकट
कोल्हापूरकरांचे मोठे सहकार्य
महापुरामुळे कोल्हापूरची स्थिती खूप गंभीर झाली होती. या स्थितीत रेस्क्यू मोहीम राबविणे जिकिरीचे होते. योग्य नियोजनाच्या माध्यमातून ‘एनडीआरएफ’च्या आमच्या सर्व जवानांनी बचाव आणि मदतकार्य राबवित पूरग्रस्तांना सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी पोहोचविले. या मदतकार्यामध्ये कोल्हापूरकरांचे आम्हांला मोठे सहकार्य लाभल्याचे ‘एनडीआरएफ’चे जवान हनुमंत यांनी सोमवारी सांगितले.
चौकट
कोल्हापूर रेस्क्यू फोर्सची साथ
या एनडीआरएफच्या जवानांना कोल्हापूर रेस्क्यू फोर्सने (केआरएफ) आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे, वडणगे या भागातील मदतकार्यात साथ दिली. त्यामध्ये सागर बगाडे, सागर वसुदेवन, अविराज गवस, अमोल गुरव, सारंग माने, निशांत गोंधळी, प्रवीण नाचणेकर, प्रथमेश कांबळे, मुनीर शेख, तेजस म्हापणेकर, आरती कोळी, अंकिता काकडे, शुभम कुंभार, दुर्वांकर देवळेकर, केदार खराडे, वैभव जेरे, सौरभ दोशी, प्रवीण कोडोलीकर, राजेंद्र बनसोडे यांचा समावेश होता.