खबरदारी! पुराआधीच कोल्हापुरात एनडीआरएफची टीम तैनात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत
By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 17, 2023 07:28 PM2023-07-17T19:28:46+5:302023-07-17T19:31:02+5:30
संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बोटी, लाईफ जॅकेटसारख्या बचावाच्या अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज
कोल्हापूर : जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी सोमवारी एनडीआरएफची एक टीम कोल्हापुरात दाखल झाली. यापूर्वी आलेल्या दाेन महापुरांच्या अनुभवावरून जुलै महिन्यातील शेवटचे १० दिवस कोल्हापूरसाठी हायअलर्ट असतात. पूर आलाच तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही टीम कोल्हापूरला पाठवली आहे. तर संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बोटी, लाईफ जॅकेटसारख्या बचावाच्या अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज झाले आहे.
कोल्हापूरला २०१९ व २०२१ साली २० जुलैपासून पुढील चार ते आठ दिवसात पावसाने झोडपून काढले होते. या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात महापूर आला. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी यापुढील चार दिवसात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात पूर आणण्यासाठी पावसाला फक्त चार दिवस पुरेसे असतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे राज्य शासनाने पूर्वतयारी म्हणून कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सहा जिल्ह्यांना एनडीआरएफचे पथक पाठवले आहे.
सोमवारी एनडीआरएफची २१ जणांची तुकडी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी ११ वाजता पथकाचे प्रमुख पुरुषोत्तम सिंह, फुंदे जालिंदर यांच्यासह टीमने जिल्हाधिकारी राहुल रेखावार व निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेतली. सध्या तरी ही एकच टीम बोटींसह दाखल झाली असून गरज पडली तर आणखी टीम पाठविण्यात येणार आहेत.