सोने दरातील स्थिरतेसाठी सट्टेबाजार रोेखण्याची गरज
By admin | Published: March 1, 2015 10:53 PM2015-03-01T22:53:48+5:302015-03-01T23:18:00+5:30
फत्तेचंद रांका यांचे आवाहन -- थेट संवाद
गेल्या दीड-दोन वर्षात सोन्याच्या दरात प्रचंड चढ-उतार होत आहे. याची कारणे काय? सोन्याचा दर उतरणार असल्याच्या अफवाही पसरत आहेत. याला प्रमुख कारणे कोणती? सोन्याचे सध्याचे आणि आगामी महत्त्व कसे असणार, त्यामधील गुंतवणूक उपयुक्त आहे काय, सोन्याचे ग्राहक आता जमीन, शेअर मार्केट, कारखानदारी व आॅटोमोबाईल क्षेत्राकडे वळत आहेत. त्याचा परिणाम काय होत आहे, आदी विषयांवर सराफ, सुवर्णकार फेडरेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद...---
प्रश्न : गेल्या दीड-दोन वर्षापासून सोन्याच्या दरात प्रचंड चढ-उतार होत आहे. याची कारणे काय?
उत्तर : गेल्या दोन वर्षापासून ‘एमसीएक्स’नुसार (मेटल कमोडिटी एक्स्चेंज) आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक होत आहे. यामध्ये एकप्रकारे सट्टाबाजारच चालतो. यानुसार सोन्यामध्ये तीस टक्के रक्कम भरुन आॅनलाईन सोने खरेदी करता येऊ शकते. त्यानंतर तीन महिन्यामध्ये ते विकता येऊ शकते. अशाप्रकारे हा सट्टा चालू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता अशाप्रकारे सट्टेबाजार करणाऱ्यांची ‘लॉबी’ तयार झाली आहे. ही लॉबी सोन्याचा दर पाडणे, चढविणे आदी अफवा पसरविणे आदी प्रकार करीत आहे. यावर सर्व देशांनी बंधन घालायला हवे. त्यानंतरच सोन्याचा दर मागणी व पुरवठ्यानुसार ठरून सोन्याच्या दराला स्थिरता प्राप्त होईल.
प्रश्न : सोन्यामधील गुंतवणूक कमी होऊन ती जमिनीसह इतर क्षेत्रात होताना दिसते?
उत्तर : सोन्यामधील गुंतवणूक कमी होत आहे, ही चुकीची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात भारताची सोन्याची आयात वर्षाला ४८५ टनावरुन आता तब्बल ९०० टनावर गेली आहे. खरेदीदारांची संख्या वाढल्याशिवाय इतकी आयात कशी वाढेल. दुसऱ्या बाजूला ज्वेलर्स दुकानांचीही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षेची गुंतवणूक समजली जाते. सोने असणे म्हणजेच तुमचे ‘एटीएम’मध्ये पैसे असण्यासारखे आहे. जगाच्या पातळीवर सोने ही अशी वस्तू आहे, की ज्याला सर्वत्र महत्त्व आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही वाढतच जाणार आहे.
प्रश्न : सोन्यातील गुंतवणूक ही प्रगतीला पोषक नाही, असे बऱ्याच अर्थतज्ज्ञांचे मत आहे?
उत्तर : सुवर्ण बाजारपेठ भारतासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. कलाकुसरीच्या दागिन्यांसाठीही भारतीय बाजारपेठ जगात प्रसिध्द आहे. शासनाने सोन्याची निर्यात वाढविण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. त्यामुळे परकीय चलनही मिळेल, रोजगारही मिळेल. आपला प्रमुख व्यवसाय असतानाही चीन, जपान यांनी या क्षेत्रात आपलीे निर्यात वाढवून अर्थव्यवस्था सुधारली आहे. आपल्याकडे जे पिकते, ते विकायला हवे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, हे त्याच्या सोन्याच्या साठ्यावरच ठरविले जात आहे. त्यामुळे यामधील गुंतवणूक ही अनावश्यक म्हणता येणार नाही.
प्रश्न : आपल्याकडील गलई व्यवसाय नुकसानीत जात आहे, याची कारणे काय आहेत?
उत्तर : आपल्याकडील गलई व्यावसायिकांनी अत्याधुनिकतेची कास धरली पाहिजे. यामध्ये आता अत्याधुनिक यंत्रणा आल्या आहेत. त्यांचा वापर केला पाहिजे. इतर ठिकाणी याचा वापर सुरु झाल्यामुळेच याचा फटका आपल्याला बसत आहे.
प्रश्न : सराफ व्यावसायिकांच्या मुख्य समस्या काय आहेत?
उत्तर : सराफ व्यवसाय सध्या अनेक समस्यांमधून जात आहे. कामगार कायदे खूपच अडचणीचे ठरत आहेत. एलबीटीसह विविध करांच्या जाळ्यात या व्यवसायाला अडकविण्यात आले आहे. सुरक्षिततेचाही प्रश्न सर्वत्र आहेच. यासाठी आपल्या संघटनेकडून कोणती काळजी घ्यायला हवी, याचे प्रबोधन करण्यात येत आहे. पोलिसांचाही अनेकदा चौकशीच्या नावाखाली ससेमिरा असतो. यालाही बंधने घालायला हवीत. हॉलमार्कच्याही अडचणी आहेत. यातून मार्ग काढायला हवा.
प्रश्न : सुवर्ण बाजारपेठेचे भविष्यातील अस्तित्व काय असणार आहे?
उत्तर : आगामी किमान २५ ते ३० वर्षे सोन्याचे महत्त्व हे निश्चितच महत्त्वपूृर्ण असणार आहे. भारतामध्ये सोन्याला धार्मिक अधिष्ठान आहे. लग्नात किमान दोन तोळे तरी सोन्याची गरज भासतेच. वर्षाला प्रत्येक जिल्ह्यात २५ ते ३० हजार लग्ने होतात. सोन्याची पूजा केली जाते. यामुळे भविष्यातही याचे महत्त्व अबाधित राहणार आहे. सोने हे केवळ आभूषण, सौंदर्याचे लेणेच नव्हे, तर किमती वस्तू आहे. प्रसंगी तुमची जमीन, मालमत्ता याच्यापेक्षाही सोन्याला महत्त्व आहे आणि हे महत्त्व जगाच्या पाठीवर सर्वत्रच आहे.
अंजर अथणीकर