शाहूनगरीतच वैचारिक मशागतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:55 AM2018-03-12T00:55:40+5:302018-03-12T00:55:40+5:30

The need for conceptual cultivation in Shajigat | शाहूनगरीतच वैचारिक मशागतीची गरज

शाहूनगरीतच वैचारिक मशागतीची गरज

Next


कोल्हापूर : कोल्हापूर ही विचारांची खाण आहे. मात्र याच कोल्हापुरामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मागे पडतो की काय, असे वातावरण तयार झाले आहे. म्हणूनच याच नगरीत आता वैचारिक मशागतीची गरज आहे, असे मत पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी रविवारी व्यक्त केले.
गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलच्या शताब्दीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू समता परिषदेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरला पाटील होत्या. यावेळी प्रा. विठ्ठल बन्ने, बापूसो कांबळे, भिकशेठ पाटील, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, गणेश काळे व मुस्लिम बोर्डिंगचा यावेळी महाराव यांच्या हस्ते राजर्षी शाहू समता पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच गंगाराम कांबळे यांचे नातू अरुण, राजेंद्र कांबळे, लीलाबाई कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. गणी आजरेकर, आदिल फरास, कादर मलबारी यांनी मुस्लिम बोर्डिंगचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी कोल्हापुरातील ८५ समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ऐक्याची ग्वाही दिली.
रोखठोक भूमिका मांडताना महाराव म्हणाले, फसविणारे जाळी घेऊन बसले आहेत. प्रांत, भाषा, जात, आहार यांच्या माध्यमातून भेद निर्माण केले जात आहेत. याच कोल्हापुरात अंबाबाईचा नवराही जिथे बदलला जातोय तिथे सामान्य माणसाचे काय? अनेक उघडीनागडी माणसे असताना देवाला महागड्या साड्यांची गरज काय? या सगळ्याची शरम वाटली पाहिजे. ३३ कोटी देवांना जे जमले नाही ते एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखविले. मात्र, कोरेगाव भीमाच्या घटनेमध्ये ज्यांचा हात आहे, असे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे अजून दीड महिना मोकळे कसे? त्यांना आत टाकण्यासाठी तुम्ही आग्रह धरण्याची गरज आहे.
सत्यशोधकी खोटारडे आहेत; तर ‘बापू’, ‘बाबा’ हे काळ्या पैशांवर मठ चालवीत आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेता; मात्र याच कोल्हापूरला खचवण्याचं काम सुरू आहे. रामाच्या पारावर पूर्वी व्याख्यानं होत होती. आता तिथं दरवर्षी नुसता पाळणा हलविला जात असणार आणि छोटा राम त्यात ठेवला जात असणार! हा राम मोठा कधी होणार? पाळणा हलवून धर्म मोठा होत नाही, उलट छोटा होतो.
बबन रानगे यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कोल्हापुरात सुसंवादी वातावरण तयार करण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, सवर्णांच्या हौदावरील पाणी घेतले म्हणून मराठ्यांनी गंगाराम कांबळेंना फोडून काढले. शाहू महाराजांनी याच मराठ्यांना गंगाराम यांच्या हॉटेलात चहा प्यायला भाग पाडले. याच कोल्हापुरात आता अंबाबाई मंदिरातील भटांच्या प्रेरणेतून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीजवळ पंडितांची समाधी उभारण्याची मागणी सुरू आहे. शाहू जन्मस्थळाला १३ कोटी अजून मिळाले नाहीत. महाराज आणि डॉ. आंबेडकरांची भेट झालेली इमारत पाडली गेली.पेठापेठांमधील शाहूविचार आता राहिलेला नाही. यावेळी पापाभाई बागवान, प्रा. विश्वास देशमुख, व्यंकाप्पा भोसले, जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते उपस्थित होते.
मराठा मोर्चात फुले, आंबेडकर का वगळले?
कोल्हापुरात विराट मराठा मोर्चा निघाला. मग शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाºयांनी फुले, आंबेडकर त्यातून का वगळले? असा सवाल करीत महाराव म्हणाले, कोपर्डीची घटना घडली. त्यात एक मुलगी गेली आणि मग मोर्चे
निघाले, ज्यांना स्वार्थी मुद्दे
जोडले गेले.
शाहूंच्या वारसदारांचा हा बेशरमपणा
महाराव बोलायला उभे राहिल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थक ‘शाहू स्मारक’च्या दारात उभे राहिले. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली. ती पाहून महाराव म्हणाले, ‘त्यांच्या’ (भाजपच्या) नादाला शाहूंचे वारसदार लागले, हा बेशरमपणा आहे. छत्रपती घराण्याविषयी कुणी वाकडं बोललं त्यावेळी उत्तर द्यायला सगळ्यांत पुढे हा
महाराव होता.
आम्ही शाहूंच्या विचारांचे वारस आहोत. मग घाबरण्याची गरज नाही. ज्या हातांनी सलाम केला, त्याच हातांना कानफाडीत मारण्याचाही अधिकार आहे. ‘समझनेवालों को इशारा काफी है,’ अशा शब्दांत महाराव यांनी ही मांडणी केली.
संभाजीराजेंच्या
समर्थकांची उपस्थिती
ज्ञानेश महाराव यांनी याआधीही छत्रपती परिवारातील काही सदस्यांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या भाषणावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे समर्थक फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, माजी नगरसेवक विनायक फाळके, राहुल शिंदे, नरेंद्र इनामदार, सागर दळवी, संदीप साळोखे, प्रतीक दिंडे यांच्यासह कार्यकर्ते सभागृहाबाहेर उभे होते. त्यांच्यासमवेत पोलीसही त्यांच्याजवळ थांबले होते. मात्र, महाराव यांचे भाषण संपल्यानंतर हे कार्यकर्ते निघून गेले.
हा ‘चहावाला’ जातीत भांडणे लावणारा
गंगाराम कांबळे यांची किटली व्यासपीठावर ठेवली होती. याचा संदर्भ घेत महाराव म्हणाले, गंगाराम यांचा चहा हा सगळ्या जातिधर्मांना बांधून ठेवणारा आहे; तर सध्याचा देशातील चहावाला हा जातीत भांडणे लावणारा आहे. यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: The need for conceptual cultivation in Shajigat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.