वाचनसंस्कृती वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे
By Admin | Published: April 23, 2016 01:20 AM2016-04-23T01:20:39+5:302016-04-23T01:43:32+5:30
जागतिक पुस्तक दिन : गावोगावी ग्रंथालये विकसित करायला हवीत
संतोष तोडकर -- कोल्हापूर --जगप्रसिद्ध लेखक शेक्सपिअरचा जन्मदिन म्हणजे २३ एप्रिल हा दिवस ‘युनोस्को’ने सन १९९५ पासून जगभर ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा साजरा केला जावा, असे जाहीर केले. अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणाऱ्या या चळवळीला यावर्षी २१ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे तसेच वाचनसंस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.
‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागील पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरांतून ऐकायला मिळते. ती गोष्ट काही अंशी सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, संगणक, चित्रपट, नाटके, सोशल मीडिया, स्मार्टफोन आदी मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबलाटात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे.
म्हणून या माध्यमाचा गरजेपुरता वापर कसा करावा हे जाणीवपूर्वक शिकावे लागेल. लहानपणापासूनच मुलांना वाचनाची गोडी लावायला हवी. चित्रमय भाषेकडून ग्रंथभाषेकडे त्यांना आकर्षित करायला हवे. वाचन समृद्ध असल्यास कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सर्जनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव, त्यास आवश्यक असणारे संवेदनशील मनास खतपाणी मिळते. खऱ्या अर्थाने मानवतेचे मूल्य अंगी बाणण्यास मदत होते.
कमी होत असलेली वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्णात सहाशेहून अधिक ग्रंथालयांमध्ये लाखो पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामध्ये अनेक दुर्मीळ ग्रंथ जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यांचा वापर करायला हवा. ‘ग्रंथ आपुल्या दारी’ यासारखे उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यात यायला हवेत. खेडोपाडी आणि दुर्गम भागांत असलेल्या शाळा आणि तेथील विद्यार्थ्यांपर्यंत शाळेच्या अभ्यासाखेरीज अन्य विविध विषयांवरील पुस्तके मोठ्या प्रमाणात पोहोचली पाहिजेत. यातून वाचनसंस्कृती नक्कीच वाढीस लागेल.
आजच्या काळात एकत्र कुटुंबपद्धतीचा ऱ्हास, संवादहीन भवताल यातून निर्माण होणारी नैराश्यता यावर उपाय म्हणून वाचनाकडे वळणे महत्त्वाचे वाटते. चौफेर वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास होण्यास तसेच ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यास मदत होते. प्रत्येकाने स्वत:चे वैयक्तिक ग्रंथालय विकसीत करावे.
- युवराज कदम
(संकल्पक- वाचन कट्टा )
सध्या पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यक्तिमत्त्व विकास, प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, आरोग्यविषयक पुस्तक ांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. तरुणांमध्येही वाचनाचे प्रमाण वाढत आहे; परंतु साहित्य, कथा-कादंबऱ्यांपेक्षा करिअर, स्पर्धा परीक्षा या विषयावरील पुस्तकांची मागणी त्यांच्याकडून केली जाते.
- अलोक जोशी, (अक्षर दालन)