मसाई पठाराच्या संवर्धन आणि विकासाची गरज
By admin | Published: October 28, 2014 10:27 PM2014-10-28T22:27:53+5:302014-10-29T00:14:12+5:30
दहा किलोमीटर लांबी : पाचगणीच्या ‘टेबल लँड’पेक्षा दहा पटीने मोठे
किरण मस्कर - कोतोली -मसाई पठार हे आशिया खंडातील मोठ्या पठारांपैकी एक प्रसिद्ध पठार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील कोकण व घाटावरील भागाच्या मधोमध असणारे मसाई पठार हे एक निसर्गरम्य स्थान असून, याचे क्षेत्र पाचगणी येथील टेबल लँडपेक्षा दहा पटीने मोठे आहे. येथे अतिशय सुंदर अशा पांडवकालीन गुहा आहेत. या ठिकाणच्या कोरीव गुहांना ‘पांडव लेणी’ असे म्हणतात. मसाईदेवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या समोरील उत्तर बाजूला ‘पांडवदरा’ आहे. ह्या पठारास तलावांचे पठार असेही म्हणतात.
या ठिकाणी २ मोठ्या आणि २ लहान गुहा आहेत. एक भुयारी मार्ग असून, मोठ्या गुहेत १ पाडवी, मोठे माजघर, त्याच्या आत १ लहान खोली असून बाजूच्या भिंतींना खांबाचे आकार दिले आहेत. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात या गुहा खोदल्या असाव्यात आणि त्यात धार्मिक शिक्षण दिले जात असावे, अशी कागदोपत्री नोंद आहे.
मसाई देवळाखाली दुसऱ्या बाजूला जाणारा भुयारी मार्ग आजही अस्तित्वात आहे. या गुहेला ‘चकवा गुहा’ म्हणतात. मसाई पठारापासून पश्चिमेला थोड्याच अंतरावर दगडांनी उभी असलेली कुवारणी आजही पहावयास मिळत आहे. जणू नवी वधू (नवरी) शालू नेसून उभी असल्याचे चित्र आजही पहावयास मिळत असून पावसामुळे हिरवीगार वेली त्यावर चढलेली पहावयास मिळत आहेत.
पठाराचा व्याप मोठा असल्याने यावर पाण्याचा, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. या वाऱ्याचा उपयोग करून घेऊन ‘पवनचक्कीद्वारा वीजनिर्मिती’चा प्रयत्न होता. त्यासाठी पठारावर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘वारामापक यंत्र’ बसविले होते.
पठाराचा बहुतेक भाग वनखात्याच्या अखत्यारित आहे. खात्याने प्रत्येक दरीत वृक्षारोपण करून झाडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळात मसाई पठाराचा विकास व्हावा, पर्यटन केंद्र व्हावे म्हणून काही हौशी तरुणांनी पंचवार्षिक आराखडा तयार केला. त्यात पठारावर जाण्या-येण्यासाठी रस्ता तयार करणे, दऱ्याखोऱ्या वनश्रीने नटविणे, ईगल ‘मंकीनोज’सारखे पिकनिक पॉर्इंट तयार करणे, २ कि.मी. परिघाच्या ‘ईश्वर म्हादू’ तलावातील गाळ काढून तो पर्यटकांना पोहण्यासाठी खुला करणे. दऱ्यातील जिवंत झऱ्यांना हौद बांधून पिण्याच्या पाण्याची सोय करणे, गुहा साफ करणे, विश्रांतीगृह याचा समावेश आहे. (समाप्त)
मसाई पठार पूर्णपणे जांभी दगडाचे असून २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ््या दहा पठारांनी ते बनले आहे. पठाराच्या बाजूला सुमारे दोनशे ते सहाशे फूट खोल दरी असून या दरीमधून बारमाही वाहणारे पाण्याचे जिवंत झरे पहावयास मिळतात. येथे ३० ते ३५ गुहा असून त्या १०० ते १५० फूट आत खोलवर खोदल्या आहेत.