माणसाला सक्षम करणाऱ्या संस्कृतीची गरज
By admin | Published: June 16, 2017 10:50 PM2017-06-16T22:50:49+5:302017-06-16T22:50:49+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन : ‘स्वयंसिद्धा’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन; विविध पुरस्कारांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : एखादी व्यक्ती जोपर्यंत आर्थिक स्वरूपात कुटुंबाला हातभार लावत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. ‘स्वयंसिद्धा’ने हे आर्थिक बळ महिलांना उद्योगाच्या रूपाने दिले. आजवर आपण लोकांना हात पसरायला शिकविले, पण आता त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकविणाऱ्या आणि त्यांना सक्षम करणाऱ्या संस्कृतीची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवारी स्वयंसिद्धा महिला संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अंजली पाटील, ‘स्वयंसिद्धा’च्या संचालिका कांचन परुळेकर, सुधर्म जामसांडेकर, शैलजा काटकर, सुहास कोरगांवकर, स्मिता बेरी, गीता जाधव, अप्पासाहेब ताटे, अनिलराज जगदाळे, तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी अनुराधा तेंडुलकर, उमा देसाई, विलास शिंदे डॉ. सुरेश डंबोळे, इंदुताई भदरगे यांच्यासह अन्य व्यक्ती व संघटनांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, आजकालच्या पिढीने मागत बसण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर मिळविण्याच्या विचाराने पुढे जाणे आवश्यक आहे. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून अशाच पद्धतीने त्यांना उभे करीत आहे. जेव्हा देशातील प्रत्येक तरुण किमान वीस तास राबेल तेव्हाच देशाची संपत्ती वाढून प्रगती करेल. ‘स्वयंसिद्धा’ने कोणताही राजकीय हेतू अथवा लाभाची इच्छा न बाळगता महिलांचे कर्तृत्व घराबाहेर आणले आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर देशाची संपत्ती वाढविण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी केला.
यावेळी पुरस्कारप्राप्त विलास शिंदे यांनी सह्याद्री समूहाने द्राक्ष उत्पादनावर शेतकऱ्यांची प्रगती कशी साधली याची थोडक्यात माहिती दिली. शेतीकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते, पण सकारात्मकता आणली तर शेतीसारखी समृद्धी
अन्य कोणत्याही क्षेत्रांत नाही, असे मत व्यक्त केले. सुरेश डंबोळे यांनी ‘स्वयंसिद्धा’ने संस्थेच्या
कार्याची दखल घेतली याबद्दल आभार मानले.
कांचन परुळेकर यांनी प्रास्ताविकात ‘स्वयंसिद्धा’च्या पंचवीस वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला व लवकरच टाकाळा येथे स्वयंप्रेरिका मॉल सुरू होत असल्याची माहिती दिली. तृप्ती पुरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
अनुराधा तेंडुलकर यांच्याकडून लाखाची देणगी
‘स्वयंसिद्धा’तर्फे सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा तेंडुलकर यांना स्मिता कोरगांवकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तेंडुलकर यांनी ‘स्वयंसिद्धा’च्या महिला सबलीकरणाच्या कार्यासाठी त्वरित एक लाखाचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.
कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवारी स्वयंसिद्धा महिला संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा तेंडुलकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कांचन परुळेकर, अंजली पाटील, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड, तृप्ती पुरेकर उपस्थित होत्या.