पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची गरज
By admin | Published: January 15, 2016 11:44 PM2016-01-15T23:44:13+5:302016-01-16T00:49:50+5:30
कैलाश चंद्रा : विद्यापीठातील ‘जैवविविधता, जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ परिषदेला प्रारंभ
कोल्हापूर : बदलती जीवनशैली आणि त्या जीवनशैलीच्या मागणीपोटी पर्यावरणाप्रती वाढत चाललेला निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. कैलाश चंद्रा यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘जैवविविधता व जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे होते.
डॉ. चंद्रा म्हणाले, जैवविविधता कुठेतरी दूर असते. तिचा आपल्याशी काही संबंध नाही, असे नसते. जैवविविधतेचा आपल्या प्रत्येक कृतीवर परिणाम दिसून येतो. जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होताना दिसतो. जैवस्रोतांविषयी संशोधन आणि त्यांचे व्यवस्थापन याला आजघडीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी. जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे केवळ मानवच नव्हे, तर भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षण ही अनिवार्य बाब आहे,
डॉ. मोरे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येचा सर्वाधिक चिंताजनक दुष्परिणाम जैवविविधतेवर झालेला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी जशा उपाययोजना केल्या जातात. तशाच त्या जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीतही योजणे गरजेचे आहे.
यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. परिषदेचे समन्वयक डॉ. डी. व्ही. मुळे यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे संयोजन सहसचिव डॉ. जी. व्ही. झोडपे यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात प्रा. जी. एन. वानखेडे, डॉ. पी. एस. भटनागर, डॉ. वरद गिरी यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात उत्कृष्ट शोधनिबंध स्पर्धा व उत्कृष्ट पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली. (प्रतिनिधी)
जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होतात.
प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी.
जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाही
प्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षणही अनिवार्य