दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची गरज, कुरुंदवाड येथे शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने भेसळीचा प्रश्न चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:45 PM2024-04-30T15:45:06+5:302024-04-30T15:45:20+5:30
निवासी सैनिकी पॅटर्न शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी अशा सुमारे ४० जणांना विषबाधा
गणपती कोळी
कुरुंदवाड : येथील सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याने शहर व परिसरातील दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बासुंदी खाल्ल्याने विषबाधा झाली असताना अन्न व औषध प्रशासन अधिकारी भेसळीचा शोध घेण्याऐवजी तीव्र तापमानाचे कारण सांगून दुग्धजन्य पदार्थ करणाऱ्या भेसळखोरांना एक प्रकारे क्लीनचीट दिली जात आहे. त्यामुळे पालकांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या भेसळखोरांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
येथील निवासी सैनिकी पॅटर्न शाळेतील विद्यार्थ्यांना रविवारी दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी अशा सुमारे ४० जणांना विषबाधा झाली होती. बाधित विद्यार्थी व कर्मचारी यांंच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, धोका टळला आहे. जेवणात बासुंदी असल्याने बासुंदी खाऊन पाणी प्यायल्याने तसेच उच्च तापमान यामुळे डीहायड्रेशन झाल्याचा अंदाज शाळा व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी करत आहेत.
या घटनेनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद वैद्यकीय यंत्रणा सतर्क होऊन वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. शाळा व्यवस्थापनाने वेळीच उपचार केल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका टळला आहे. सोमवारी अन्न व औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांनी रुग्णालयात जाऊन घटनेचा पंचनामा केला.
टोळी सक्रिय असल्याची चर्चा
शहर व परिसरात दूध, खवा, बासुंदीसह इतर दुग्धजन्य पदार्थांची भेसळ सर्रासपणे सुरू आहे. यापूर्वी अनेकदा भेसळीचे प्रकार या परिसरात उघडकीस आले आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या जुजबी कारवाईमुळे अद्याप भेसळीचे प्रमाण सुरूच आहे. भेसळीतून जादा कमाई करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ करणारी टोळी सक्रिय आहे. त्यामुळे अशा भेसळखोरांचा शोध घेऊन भेसळ करण्याचे धाडस पुन्हा होऊ नये, अशी कारवाई करणे गरजेचे आहे.