Kolhapur- आपलं सीपीआर, बोगस कारभार: सर्जिकल साहित्य खरेदीच्या चौकशीची गरज
By समीर देशपांडे | Published: July 20, 2024 12:23 PM2024-07-20T12:23:18+5:302024-07-20T12:24:38+5:30
कागदपत्रांमध्ये प्रचंड विसंगती, बोगसपणाचा कळस
समीर देशपांडे
कोल्हापूर : मुलुंड येथील कामगार रुग्णालयाचे बोगस दरकरारपत्र दाखवून ४ कोटी ८७ लाख रुपयांचा साहित्य पुरवठा करण्याचा हा बोगसपणा म्हणजे सीपीआर खरेदीतील हिमनगाचे टोक असल्याचे मानले जाते. गेल्याच वर्षी दुसऱ्याचा अन्न, औषध प्रशासनाचा परवाना जोडून कोट्यवधी रुपयांचे साहित्य पुरवठा करणाऱ्या न्यूटन कंपनीला काळ्या यादीत टाकून अजिंक्य पाटीलला अटक करण्यात आली होती. आता या सव्वाबारा कोटींच्या निविदा प्रक्रियेचीही चौकशी होण्याची गरज आहे.
डाॅ. अनिता सैबन्नावर यांच्याकडे फेब्रुवारी २०२३ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार होता. त्यांनी १३ फेब्रुवारी २३ ला जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव यांना पत्र पाठवून या साहित्याच्या खरेदीसाठीची प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी केली. रुग्णसेवेसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्जिकल साहित्याचा वापर रुग्णसेवेत करता यावा व रुग्णसेवेसाठी होणाऱ्या खर्चात काटकसर व्हावी या उद्देशाने ॲडव्हान्स वूंड केअर ड्रेसिंगची मागणी रुग्णालयाच्या विविध वाॅर्डमधून घेण्यात आली.
त्यानुसार एकूण १२ कोटी १९ लाख ५० हजार रुपयांच्या प्रस्तावास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. या रुग्णालयात रुग्णसेवेसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आवश्यक असणारे सर्जिकल साहित्य व लॅब मटेरियल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याची गरज आहे. या साहित्यामुळे रुग्णसेवेच्या खर्चात बचत होणार आहे. म्हणून ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या खरेदी प्रस्तावास मान्यता मिळावी, असे पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही तातडीने यावर कार्यवाही करत दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी २३ ला या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. परंतु या सर्वच वरिष्ठांनी रुग्णसेवेच्या खर्चात बचत कशी होणार हे मात्र कुठेही स्पष्ट केलेले नाही.
एकाच दिवशी ५१ खरेदी आदेश
खरेदीच्या बाबतीत सीपीआरची प्रशासकीय यंत्रणा इतकी वेगवान आहे की एकाच दिवशी हे मटेरियल घेण्यासाठीचे सर्व आदेश काढण्यात आले आहेत. १० मार्च २०२३ ला ५१ पुरवठा आदेश देण्यात आले आहेत. यातील प्रत्येक आदेश ९ लाख ६३ हजार ९०० रुपयांचा असून याच पद्धतीने एकाच दिवशी ठेकेदाराला बिलाची रक्कमही अदा करण्यात आली आहे. पहिल्या पत्रापासूनच नियोजनपूर्वक काम सुरू असल्याने या यंत्रणेने कुठेही वेळ दवडलेला नाही.
काही विभागांना पुरवठाच नाही
सीपीआरच्या कान, नाक, घसा विभागाने ८ डिसेंबर २०२२ रोजी वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे ड्रेसिंग मटेरियलची मागणी केली होती. मुळात त्यांनी २००० नगांची मागणी केली असताना नंतर ती खोडून २००० बाॅक्स करण्यात आली. यानंतर १० मार्च २३ ला पुरवठा आदेश देऊनही तब्बल जून उजाडला तरी या विभागाला हे साहित्य देण्यात आले नव्हते. ५ जून २३ रोजी या विभागाने अधिष्ठाता यांना पत्र लिहून मागितलेले १५०० पॅडचे साहित्य मिळालेले नाही. ते त्वरित मिळावे असे पत्र पाठवले आहे. याचा अर्थ या विभागाला तोपर्यंत पुरवठाच झालेला नव्हता. परंतु बिल मात्र १८ मे २०२३ रोजी अदा झाल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीच्या कंपनीच्या लेटरपॅडचाही संशय
एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असताना त्यातील कागद आणि कागद पारखून पाहण्याची गरज असताना तो न पाहता ज्याने त्याने सह्या करून लवकर प्रस्ताव पाठवावा, तो मंजूर करून घ्यावा, साहित्य पुरवठा होऊन लवकर बिल निघावे यासाठी पद्धतशीर यंत्रणा राबल्याचे स्पष्ट होत आहे. यातील मुलुंडच्या शासकीय रुग्णालयाचे बोगस लेटरपॅड आणि पत्र असताना दुसरीकडे दिल्लीच्या संबंधित कंपनीचे लेटरपॅडही संशयास्पद वाटत आहे.