कोल्हापुरात उपनगरीय रेल्वेस्थानकाची गरज; दोन प्लॅटफॉर्म्सची उभारणी शक्य
By संदीप आडनाईक | Published: December 10, 2023 03:28 PM2023-12-10T15:28:18+5:302023-12-10T15:30:01+5:30
गोकुळ हॉटेल ते परिख पूल परिसरापर्यंत सुमारे बारा एकरचा परिसर रेल्वेचा आहे.
कोल्हापूर : वाढत्या शहरीकरणामुळे आणि कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग होणार असल्यामुळे भविष्यात उपनगरीय रेल्वेस्थानक विकसित करण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समध्ये मुबलक जागा उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर केल्यास आणखी गाड्या वाढू शकतात.
गोकुळ हॉटेल ते परिख पूल परिसरापर्यंत सुमारे बारा एकरचा परिसर रेल्वेचा आहे. मार्केट यार्ड परिसरात सुमारे चाळीस एकरहून अधिक जागा आहे. शाहूपुरी व्यापारी पेठ परिसरातही सुमारे दोन एकर परिसर जागा आहे. जेम्स स्टोन ते परिख पूल परिसरापर्यंत मोठी जागा आहे. या जागेत दोन प्लॅटफॉर्मची उभारणी शक्य आहे. सध्याच्या रेल्वेस्थानकावरून एक ते तीन प्लॅटफार्मवरून एक्सप्रेस आणि संभाव्य दोन प्लॅटफार्ममधून पॅसेंजर गाड्या सोडण्याचा विचार केला पाहिजे. यासाठी उपनगरीय प्रवासी वाहतूकीसाठी उचगाव परिसरात उपनगरीय रेल्वस्थानक उभारल्यास ही गरज भागू शकते.
कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडले जाणार असल्यामुळे आणि शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्याचा विचार करुन सध्याच्या रेल्वेस्थानकाला वाढीव जागा हवी आहे. त्यासाठी गोकुळ हॉटेलजवळील आडव्या जागेत तसेच भाजी मंडई परिसरातील जागेत प्लॅटफार्म आणि ट्रॅकची संख्या वाढल्यास जादा प्लॅटफार्मवरून रेल्वेगाड्या धावू शकतात. पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर प्लॅटफार्मची उभारणी केल्यास प्रवाशांना अधिकाधिक सुविधा करणे शक्य आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान
सध्या कोल्हापूर रेल्वेस्थानकावर सुमारे २०० कर्मचारी काम करतात. त्यांच्या निवासस्थानाची सुमारे दोन एकर परिसराची जागा आहे. कांहीजण क्वार्टर्समध्ये, कांही घरे भाड्याने घेउन तर काहीजण मिरज येथून येउनजाउन काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी जुनी क्वार्टर्स पाडून एका अपार्टमेंटमध्ये निवासाची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. यामुळेही रेल्वेच्यास्थानकाच्या परिसरात सुमारे चार ते पाच एकराची मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या जागेचा वापर नव्या ट्रॅकसाठी होऊ शकतो. हा ट्रॅक झाल्यास मिरज जंक्शन येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्या कोल्हापूर रेल्वेस्थानकापर्यंत येऊ शकतात. व्यापारी, नोकरवर्ग, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांचा प्रवास त्यामुळे सोयीचा आणि जलद होऊ शकतो. रेल्वेस्थानकावर भौतिक सुविधा आहेत. फक्त स्थानकाचे अत्याधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाची गरज आहे.