गुटखा तस्करीच्या मुळाशी जाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:08+5:302021-03-01T04:27:08+5:30

संदीप बावचे जयसिंगपूर : महाराष्ट्रात आठ वर्षांपासून गुटखाबंदी असतानाही कायद्याचे नियम तोडून अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे ...

The need to get to the root of gutkha smuggling | गुटखा तस्करीच्या मुळाशी जाण्याची गरज

गुटखा तस्करीच्या मुळाशी जाण्याची गरज

Next

संदीप बावचे

जयसिंगपूर : महाराष्ट्रात आठ वर्षांपासून गुटखाबंदी असतानाही कायद्याचे नियम तोडून अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते. त्यामुळे खरोखरच गुटखाबंदी आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गुटख्याचे कनेक्शन कसे आहे, त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई झाली तरच खऱ्या अर्थाने गुटखाबंदी यशस्वी होणार आहे.

गुटखा तयार करणे, विकणे, साठवणे आणि त्याची वाहतूक करणे यावर कायद्याने बंदी घातली आहे. सन २०१२ साली हा कायदा अमलात आणण्यात आला. बंदी असतानाही अवैधरीत्या गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरूच असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील अनेक पानटपऱ्यांवर राजरोसपणे गुटखा विकला जात असताना त्याला आशीर्वाद कोणाचा, असा प्रश्न सामान्य नागरिकांना आहे.

जिल्ह्यात अगदी सहजपणे गुटख्याची तस्करी सुरू आहे. पूर्वी १८८ कलमाद्वारे गुटखाविरोधी कारवाई केली जात होती. अलीकडच्या काळात ३२८ कलम लागू करण्यात आले आहे. यामध्ये सात ते दहा वर्षांची शिक्षा आहे. असे असतानाही गुटख्याची राजरोसपणे सर्रास विक्री सुरू असून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. अवैध व्यवसायावर कठोर कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांची असताना स्थानिक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात तीन वेळा गुटखा साठ्यावर कारवाई झाली. त्यामुळे गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

..............

शिक्षेची तरतूद

शिरोळ तालुक्यात येणारा गुटखा हा इचलकरंजी मार्गे येतो. कारवाई होते, मात्र त्याच्या मुळाशी जाऊन तपास होत नाही. खरोखरच गुटखाबंदी गंभीरपणे राबवायची असेल तर यावर कारवाई करणारी यंत्रणा आणि आणखी कडक शिक्षेची तरतूद करणे गरजेचे आहे. तरच गुटखाबंदी शक्य आहे.

............

कोट - गुटखा सापडल्यानंतर वाहतूक किंवा साठाधारकांवरच कारवाई होते. गुटखा कोठून आला, कोणत्या कंपनीचा गुटखा आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने गुटखाबंदी होणार आहे.

- डॉ. महावीर अक्कोळे

Web Title: The need to get to the root of gutkha smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.