‘आजरा’ चालू ठेवणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:32 AM2019-07-20T00:32:13+5:302019-07-20T00:32:18+5:30
कृष्णा सावंत। लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : आजरा कारखान्याचे संचालक मंडळ व कामगारांमधील संघर्ष संस्थेच्या हिताचा नाही. समन्वय ठेवून ...
कृष्णा सावंत।
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : आजरा कारखान्याचे संचालक मंडळ व कामगारांमधील संघर्ष संस्थेच्या हिताचा नाही. समन्वय ठेवून यावर्षी कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालवायला देऊन कारखाना चालू ठेवणे संबंधित सर्व घटकांच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे.
साखर कारखानदारीबाबत भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. त्यामुळे आजरा कारखान्यासारख्या राज्यातील अनेक युनिटवर मोठा परिणाम झाला आहे. आजरा कारखान्याला शासन धोरणासह व्यवस्थापनातील त्रुटीचाही फटका बसला आहे. काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कोट्यवधीचे नुकसान कारखान्याला झाले आहे. याचा परिणाम कर्जाचा आकडा १०० कोटींकडे वाढत गेला.
कामगारांनी लक्ष घातले म्हणून काही अधिकाऱ्यांचा गैरकारभार बाहेर आला. व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या. त्यामुळे कारखाना बचावासाठी कामगारांनी सर्वच संचालकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. पत्रकारांना बोलावून संचालकांच्या एका सभेत अधिकाºयासह व्यवस्थापनातील कारनाम्याचे वाभाडे काढले.
स्वबळावर कारखाना चालविणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधारी संचालकांना चालवायला देण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यास भाग पाडले. विशेष सभेपूर्वी कारखान्यातील सर्वच विरोधी घटकांनी स्वतंत्र मेळावे घेऊन भूमिका मांडली.
मात्र, कामगार विरोधकांना बळी न पडता कारखाना चालवायला देण्यासाठी सत्ताधाºयाच्या बाजूने ठाम राहिला. इतकेच नव्हे तर विशेष सभेत चालवायला देण्याचा निर्णय करण्यासाठी हातात फलक घेऊन सत्ताधाºयांना मानसिक बळ दिले. यामागे कारखाना चालू राहणे हा कामगारांचा हेतू असला तरी सोमवारी (दि.१५ जुलै) कारखाना अध्यक्ष अशोक चराटी यांच्यासोबत गोंधळ घालून आतापर्यंत केलेली मेहनत वाया घालवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण अनपेक्षितपणे चराटी यांनी राजीनामा दिला आहे.
चराटी यांच्या राजीनाम्यामुळे कामगारांनी आतापर्यंत केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. चराटी यांना जबाबदारीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे. कारखाना चालवायला घेणाºया पार्ट्यांना चुकीचा संदेश जाण्याची शक्यता तयार झाली आहे.
कारखाना चालवायला देण्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे हे खरे आहे.त्यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. मंगळवारी (दि. १६) संचालक मंडळ व सुकाणू समितीची बैठक झाली. कारखाना चालवायला देण्याच्या प्रक्रियेची माहिती मिळू शकते हे माहीत असूनही आदल्यादिवशी चराटी यांच्यासोबत हुज्जत घातल्याने व चराटी यांनी राजीनामा दिल्याने कारखाना चालवायला देण्याची प्रक्रिया बॅकफुटवर आली आहे. कारखाना चालू ठेवणे गरजेचे असल्याने संबंधित सर्व घटकांनी हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. सामंजस्याची व तडजोडीची भूमिका घेऊन वाटचाल करणे सर्वांच्या हिताचे आहे.
संयमाची गरज : चराटी यांच्या राजीनाम्यानंतर सर्व संचालकांची राजीनाम्याची मागणी करण्यात येत असल्याचे समजते. परंतु, प्रशासक आल्यास कारखाना चालवायला देण्याची प्रक्रिया थंडावून अवस्था बिकट होईल. प्रशासक आणणे हा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो. त्यामुळे संयम राखणे महत्त्वाचे आहे.