जीवनासाठी प्रयोजनाची गरज
By admin | Published: August 3, 2015 11:21 PM2015-08-03T23:21:57+5:302015-08-04T00:10:13+5:30
अभय बंग : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान
विटा : व्यसनांचे व्यापारी नव्या पिढीला बरबाद करण्यासाठी सरसावले आहेत; पण नव्या पिढीने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. शिक्षण व करिअर यांचे आयोजन करून चालणार नाही, तर जीवन कसे व कशासाठी जगावे, याचे प्रयोजन करण्याची खरी गरज असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने डॉ. बंग यांना यावर्षीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील, भाई संपतराव पवार, आशाताई बोले, अॅड. सुभाष पाटील, अध्यक्ष सुभाष पवार उपस्थित होते.प्रारंभी डॉ. बंग यांना भाई वैद्य, श्रीमती हौसाताई पाटील यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. बंग म्हणाले, लहान-लहान राजकीय पुढाऱ्यांची मोठी-मोठी पोस्टर्स लागतात, तेव्हा भारतीय समाजाचा सूर्य अस्ताला आला आहे का? असा प्रश्न पडतो. व्यसनांचे व्यापारी वाढल्याने तंबाखू, मावा, गुटखा, दारूचा रोग समाजात वाढू लागला आहे. गडचिरोली जिल्'ाचे वार्षिक बजेट १५७ कोटीचे असताना, व्यसनांसाठी तेथील लोक २६० कोटी रूपयांचा चुराडा करतात. ही गंभीर बाब आहे. दारूबंदी, व्यसनमुक्ती हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जवळचे विषय होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपत असताना तरुण पिढीसह समाजाने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. महात्मा गांधीजींच्या आश्रमात आम्ही शिकलो. त्यामुळे गांधीजींची समाजकार्याची प्रेरणा आम्हाला मिळाल्याने आम्हा दोघा भावांना गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अदिवासी लोकांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले.यावेळी भाई वैद्य म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अंगात देशाला स्वातंत्र्य देण्याचे काम भिनले होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आज प्रेरणादायी आहे. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांचे आयुष्य उजाळले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलांच्यात जी प्रेरणा, जो आवेश होता, तो मात्र आज दुर्दैवाने पाहावयास मिळत नाही. यावेळी अॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (वार्ताहर)