कागलजवळ महामार्गावर नव्या सर्कलची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:16+5:302021-06-25T04:18:16+5:30
: पुणे-बंगळुरू महामार्गाचे सहा पदरीकरण काम लवकरच सुरू होणार असून चौपदरीकरण कामात राहिलेल्या त्रुटी दुरूस्त करून स्थानिक नागरिकांच्या गैरसोयी ...
: पुणे-बंगळुरू महामार्गाचे सहा पदरीकरण काम लवकरच सुरू होणार असून चौपदरीकरण कामात राहिलेल्या त्रुटी दुरूस्त करून स्थानिक नागरिकांच्या गैरसोयी दूर केल्या जाणार आहेत. यातून कागल शहरात सध्या असणाऱ्या आर.टी.ओ. चेकपोस्टजवळ नवीन सर्कल तयार करावे, अशी मागणी या परिसरातील लोकांच्याकडून होत आहे.
निपाणीकडून येताना कागल शहरात प्रवेश करण्यासाठी तसेच सांगाव हुपरीकडे जाण्यासाठी हा सर्कल उपयोगी ठरणार आहे.
सध्या आयबीपी पेट्रोल पंपाजवळ बोगदा आहे. पण नवीन आर.टी.ओ. चेकपोस्टची उभारणी झाल्यामुळे हा बोगदा अडचणीत आला आहे. कारण निपाणीकडून येऊन कागल शहरात प्रवेश करताना या बोगद्यातून नवीन चेकपोस्ट नाकाच ओलंडता येणार नाही, अशी रचना व बांधकाम येथे झाले आहे. तर राजधानी धाब्याजवळ एक लहान बोगदा असून तो अरूंद जागेत आहे. तेथून शहरात प्रवेश करताना लहान गल्लीतून जावे लागते. हे दोन पर्याय सोडले तर मग बसस्थानकाजवळील बोगद्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र यामुळे मोठा वळसा घालून शहरात यावे लागते. म्हणून सध्याच्या आर.टी.ओ. नाका आणि हाॅटेल राज डिलक्स यांच्या दरम्यान नवीन सर्कलची गरज आहे.
चौकट
● दळणवळणासाठी सोयीस्कर
शहरातील निपाणी वेस ते महामार्ग असा दुपदरी रस्ता नगरपालीकेने केला आहे. हा रस्ता सांगाव नाका येथे कागल इंचलकरजी रस्त्याला मिळतो. या रस्त्याचे रुंदीकरण आणि निपाणी वेस ते थेट गहिनीनाथ गैबी पीरनगर असा आठरा फुटी नवा रस्ता तयार करण्याचा आराखडा निश्चित झाला आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभाग कागल इंचलकरजी हा दळणवळण मार्ग या सर्कलमुळे सुरळीत होईल. या नव्या सर्कलसाठी चांगली उपलब्ध आहे. कारण नवीन आर.टी.ओ. चेक पोस्ट नाका उभारल्यामुळे सध्याचा तपासणी नाका बंद होणार आहे. दोन्ही बाजुला मोकळी जागा आहे.
● कोट
"चौपदरीकरण कामात मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या. कागलकरांना अांदोलन करावे लागले. आता सहापदरीकरणात या त्रुटी दूर होतील, अशी अपेक्षा आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत नागरीकरणात मोठे बदल झाले आहेत. या बदलाचा भाग म्हणून कागलजवळ महामार्गावर हा नवा सर्कल हवा. यामुळे बसस्थानक रिंगरोड परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल."
संजय ठाणेकर
( उपाध्यक्ष, चौपदरीकरण कृती समिती कागल)
.
फोटो कॅपशन
आर.टी.ओ. चेक पोस्टजवळ कागल शहरातून चाळीस फुटी रस्ता महामार्गास येऊन मिळाला आहे. येथे नवीन सर्कल तयार करावे, अशी मागणी आहे.