राज्याच्या विकासासाठी नवक्रांती हवी

By admin | Published: March 3, 2015 10:57 PM2015-03-03T22:57:58+5:302015-03-03T23:02:21+5:30

माधव भंडारी : काँग्रेसने आता अधोगतीचे अपश्रेयही घ्यावे

Need for a new revolution for the development of the state | राज्याच्या विकासासाठी नवक्रांती हवी

राज्याच्या विकासासाठी नवक्रांती हवी

Next

इस्लामपूर : महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी अशा सर्व क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात झाली. मात्र मध्येच वाट चुकल्याने भ्रांतीत गेलो. या भ्रांतीतून बाहेर पडून महाराष्ट्राला पुन्हा घडविण्यासाठी क्रांतीची वाट धरली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. काँग्रेसने ५५ वर्षांच्या सत्ताकाळात अनेक धोरणे व योजना राबवून प्रगतीचे श्रेय घेतले, आता अधोगतीचे अपश्रेयही त्यांनीच घ्यायला हवे, अशी टीकाही त्यांनी केली.
येथील सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्र असा असावा... असा घडवावा’ या विषयावर भंडारी बोलत होते. दीनानाथ लाड यांनी स्वागत केले. संजय भागवत, नरेंद्र मंद्रुपकर यांची उपस्थिती होती.
भंडारी म्हणाले की, आर्थिक विषमता, बेरोजगारी व सामाजिक असुरक्षितता ही महाराष्ट्रापुढची आव्हाने आहेत. विकासाच्या विरोधातल्या निकषांवर वाढत गेलो. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी व शेती सोडणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यातून समतोल विकासाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र मागे पडला. अशावेळी विदर्भ वेगळा करण्याची मागणी होते. मुंबई, ठाणे, नाशिक परिसर सोडला की, दरडोई उत्पन्न घसरते. रेल्वेचे जाळे दिसत नाही. विदर्भात विकासाचे वाळवंट, तर कोकणात विकास शोधावा लागतो. मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे. सुशिक्षित, अल्पशिक्षित व अशिक्षितांची बेरोजगारी हे चिंतेचे विषय आहेत. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना विश्वासार्ह रोजगाराची संधी दिली पाहिजे. पोट भरण्याची संधी मिळाली, तर तो माणूस पुढच्या विकासाचे पाऊल टाकेल. या सर्वातून शेतीला बाजूला करता येणार नाही. शेतीमधील पूर्ण सामर्थ्य वापरले, तर हे शक्य आहे.
प्रादेशिक असमतोल हा राजकीय प्रश्न आहे. ज्याच्याकडे दमडीसुध्दा नाही, त्याला संपत्ती कमावण्याचा अधिकार मिळावा, असे वातावरण तयार करावे लागेल. मोडकळीस आलेले उद्योग उभे करावे लागतील. पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’चे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठीची गुणवत्ता, कौशल्ये महाराष्ट्राकडे आहेत. प्रचंड साधनसामग्री आहे. या सर्वांचा वापर झाल्यास उत्पादकता क्षेत्र विस्तारेल. शेतीखालोखाल रोजगार देण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. एकूणच रोजगार क्षेत्रातील ६५ टक्के रोजगार शेतीमधून संतुलित होईल. यामध्ये भरीव काम झाले, तर उद्यमशील महाराष्ट्र उभा राहील, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, बाबा सूर्यवंशी, सदाभाऊ खोत, विक्रमभाऊ पाटील, नगरसेवक विजय कुंभार, माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील, अ‍ॅड. बी. एस. पाटील, डॉ. सौ. जिज्ञा शहा, राजेश मंत्री, जयंत भागवत, संजय ढोबळे-पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Need for a new revolution for the development of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.