आॅक्सिजन पार्कची गरज
By admin | Published: May 10, 2017 09:10 PM2017-05-10T21:10:37+5:302017-05-10T21:10:37+5:30
वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे
वृक्षांच्या माध्यमातून सावली मिळणे गरजेचे आहे. भविष्यात तापलेल्या शहरांमध्ये वृक्षलागवडीच्या माध्यमातून मोठा आॅक्सिजन पार्क उभा करण्याची गरज निर्माण होणार आहे. जिल्ह्यातही बांधाबांधावर चारीबाजूंनी वृक्षलागवड केल्यास शेतकऱ्यांची हद्दही निश्चित होईल आणि झाडाच्या सावलीखाली थोडी विश्रांतीही घेता येईल.
कोल्हापुरात निसर्गमित्र संस्थेसारख्या काही संस्थेने जाणीवपूर्वक विविध उपक्रम आधीच सुरू केले आहेत. त्यांच्या एकेकट्या उपक्रमाला सामूहिक साथीची गरज आहे. दुर्मिळ वृक्षांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातून पर्यावरणाचाही समतोल साधता येईल.
मोकळ्या जागी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणे, त्याची लॅण्ड बँक तयार करणे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे महत्त्वाचे आहे. वन विभागाचे अधिकारी आणि प्रशासन दरवर्षी नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीनुसार काम करतात; पण या कामाला गती मिळत नाही.
राज्य शासनाने जलयुक्त शिवारसारखा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर वृक्षलागवडीचा आणि तो जतन करण्यासाठीही विशेष उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. यामध्ये पाणी फाउंडेशन, नामफाउंडेशन यासारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल का याचीही चाचपणी करावी. वृक्षलागवडीसाठी पुरेशी आणि दर्जेदार रोपे रोपवाटिकांमधून आणली पाहिजेत.
रोप लागवडीची स्थळ निश्चिती करणे, खड्डे तयार करून त्यात खत टाकून ठेवणे, वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करणे, रोप लावण्यासाठी लोकांना प्रेरित करून त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळविणे गरजेचे आहे. लावलेले वृक्ष जगले पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे.
वृक्षलागवडीची ओढ प्रत्येकाला निर्माण झाली पाहिजे यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी जागोजागी वृक्षलागवडीने आॅक्सिजन पार्क तयार होतील.
संदीप आडनाईक