पुरोगाम्यांनी एकत्र येण्याची गरज
By admin | Published: July 21, 2016 12:51 AM2016-07-21T00:51:12+5:302016-07-21T00:56:16+5:30
अशोक चौसाळकर : ‘मानवता की ओर’ अभियानाला प्रारंभ; पानसरे संघर्ष समितीचा पुढाकार
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी हे हिंसेच्या विरुद्ध मानवतावादी समाजरचना स्थापन करण्यासाठी आयुष्यभर लढले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजातील प्र्रगतिशील घटकांनी सर्व झेंडे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले.
पानसरे समता संघर्ष समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानास बुधवारपासून प्रारंभ झाला. सागरमाळ परिसरातील पानसरे यांच्या घरापासून, यादवनगर, राजारामपुरी, जनता बझार, मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावर सकाळी सात वाजता ‘निर्भय मॉर्निंग वॉक’फेरी काढण्यात आली. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. चौसाळकर म्हणाले, डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हे तिघेही विचारवंत असत्याविरुद्ध लोकांना जागरूक करीत होते. हिंसेच्या विरुद्ध मानवतावादी समाजरचना स्थापण्यासाठी प्रयत्न करीत होते. अजूनही त्यांचे हल्लेखोर सापडत नाहीत, ही खेदाची बाब आहे. गुन्हेगारांचा शोध सरकारने गांभीर्याने घेऊन दोषींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी दूर व्हावी, भेदाविरुद्ध प्रबोधन, विवेकवादाचा प्रचार हा ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानाचा उद्देश आहे.
उदय नारकर म्हणाले, जिल्ह्णात विविध ठिकाणी महाराष्ट्र अंनिस व समविचारी पक्ष, संस्था, संघटना आणि व्यक्तीतर्फे पानसरे समता संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि.२० जुलै ते २० आॅगस्ट या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये शहरातील विविध भागात सहा मॉर्निंग वॉक घेतले जातील.
या फेरीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दिलीप पवार, कृष्णात कोरे, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, तनुजा शिपूरकर, सतिश पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, अरुण पाटील, प्रकाश हिरेमठ, निशांत म्हेत्रे, प्रमोद शिंदे, अमोल कांबळे, गौतम कांबळे, सुजाता म्हेत्रे, मिनाज लाटकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
लढेंगे तो जितेंगे
बुधवारी सकाळी काढण्यात आलेल्या फेरीत ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया...’, ‘लाल सलाम...लाल सलाम... गोविंद पानसरे को लाल सलाम...’,‘लढेंगे तो जितेंगे...’अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘आम्ही प्रकाशबीजे..’, ‘तोड ही चाकोरी..’, ‘इसलिए राह संघर्ष की हम चुने..’ या चळवळींतील गाण्यांनी फेरीमध्ये चैतन्य आणले. ही फेरी मध्यवर्ती बसस्थानक चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शिवशाहीर राजू राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा गायला.