वाकरेतील पौराणिक तलाव वाचवण्यासाठी लोकचळवळीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:04+5:302021-05-13T04:25:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : वाकरे, ता. करवीर येथे उत्खननात सापडलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी यांत्रिक साधनांचा वापर केल्याने मोठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : वाकरे, ता. करवीर येथे उत्खननात सापडलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी यांत्रिक साधनांचा वापर केल्याने मोठी हानी होताना दिसत आहे. याऐवजी जर हा पौराणिक ठेवा जसाचा तसा सुरक्षित ठेवायचा असेल तर लोकसहभागातून त्याची स्वच्छता करून कमीत कमी हानी पोहचवता येऊ शकते. यासाठी पुरातत्व विभाग, तरुण मंडळे व राजकीय नेत्यांनी हातभार लावण्याची गरज असल्याचे चित्र आहे.
खा. संजय मंडलिक यांनी वाकरे गावाला सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी दिला होता. प्रकल्प उभारण्यासाठी उत्खनन सुरू असताना चौरस आकाराचा तांबड्या दगडातील आखीव-रेखीव पूर्व-पश्चिम उताराचा तलावाचा शोध लागला आहे. या तलावातील शेकडो वर्षांपासून साचत आलेला गाळ काढण्यासाठी सरपंच वसंत तोडकर गावकरी, तरुण मंडळे यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत; पण यासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी, पोकलेन या मशीनमुळे जांभ्या दगडातील दगडी पायऱ्यांच्या बांधकामाला हानी पोहोचत आहे.
काल इतिहासतज्ज्ञ व शिल्पकला अभ्यासक उमाकांत रानिंगा व कोल्हापूर हेरिटेजचे अध्यक्ष अमरजा निंबाळकर यांनी तलावाची पाहणी करून तो आठशे वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले. रानिंगा यांनी गाळ काढण्यासाठी मार्गदर्शन करताना लोकसहभागातून हे काम करावे, असे सांगितले. जेसीबीचा वापर केल्याने वापरण्यात आलेल्या जांभ्या दगडाचे तुकडे उडाले आहेत. ते दुरुस्त करणे अवघड असल्याचे सांगितले. कोल्हापूर हेरिटेजच्या निंंबाळकर यांनी कामासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
फोटो
वाकरेतील पौराणिक तळ्यातील गाळ काढण्याचे काम सर्वच पातळीवर सुरू आहे; पण याची कमीत कमी हानी होऊन जास्तीत जास्त सुरक्षित पूर्वीचे बांधकाम राखण्याचे आव्हान ग्रामस्थांपुढे आहे.