कारभारात नियोजनबद्ध विकासाची गरज
By Admin | Published: June 8, 2015 09:31 PM2015-06-08T21:31:43+5:302015-06-09T00:11:28+5:30
इचलकरंजी नगरपालिका : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारभार सुधारणार का?
राजाराम पाटील -इचलकरंजी -येथील नगरपालिकेच्या कारभारात दोन्ही कॉँग्रेस व शहर विकास आघाडी, असे सर्वच सत्तेत असल्याने पालिकेच्या कामकाजाबाबत नियोजनबद्ध विकास साधण्याची व नागरी सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी स्वीकारावी. नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारभार सुधारण्यासाठी या सर्वांना आत्मकेंद्रित होण्याची हीच वेळ आहे.नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसचे बहुमत असले, तरी दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर होती, तर शहर विकास आघाडी विरोधात होती. पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रीय कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ११ व ‘शविआ’चे १७ नगरसेवक आहेत. अशा स्थितीत जानेवारी २०१५ मध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले आणि त्यांच्या बंडास पाठिंबा दिल्याने ‘शविआ’ची भूमिका बदलली व ‘शविआ’सुद्धा सत्तेत आली.नगरपालिकेत सर्व सत्तेत आल्याने विरोधी पक्ष संपला आणि सत्तेवरील विरोधी पक्षाचा ‘अंकुश’ नाहीसा झाला. सर्वच नगरसेवक सत्तेत, त्यामुळे पालिकेमध्ये काही नगरसेवकांचा वावर वाढला. मर्जीनुसार कामे करून घेण्याचा सपाटा सुरू झाला आणि चार महिन्यांत बराचसा गोंधळ उडाला. या गोंधळात प्रशासनाचे फावले आणि हात धुऊन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि कारभाराचा बट्ट्याबोळ उडाला.अखेर ‘शविआ’ने हत्यार उपसून बांधकाम खात्याकडील कामकाजाच्या तक्रारी केल्या. नगरसेवक संतोष शेळके यांनी उपोषण केले. उपोषणाच्यानिमित्ताने पालिकेत आलेल्या आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेच्या प्रशासनास फैलावर घेतले. मुख्याधिकारी सुनील पवार यांना खडेबोल सुनावत मक्तेदार नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे सूचित केले. आमदार हाळवणकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना हा अहवाल तयार करण्यास २१ मे रोजी सांगितले. त्याला दोन आठवडे उलटले, त्याचे काय झाले? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.आगामी वर्षात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका पाहता नगरपालिकेचा कारभार सुधारून विकासकामे व नागरी सेवा देण्याचे काम नियोजनपूर्वक झाले आहे. त्यासाठी तिन्हीही (दोन्ही कॉँग्रेस व ‘शविआ’) घटक पक्षांच्या कारभाऱ्यांनी एकत्रित येऊन नगरपालिकेचे कामकाज सुधारण्याची गरज आहे. या वर्षभरात झालेल्या कामांच्या जोरावरच जनतेसमोर जाणे सोयीस्कर होणार असल्याने पक्षश्रेष्ठींनी आत्मकेंद्रित व्हावे आणि समन्वयाने विकासकामे करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भुयारी गटारीच्या विशेष सभेचे काय?
‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव व काही नगरसेवकांनी नवीन भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत तक्रार करीत मक्तेदाराची ठेव जप्त करावी, अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली. या विषयावर विशेष सभा बोलविण्याचा प्रस्ताव २८ मे रोजी नगराध्यक्षांसमोर ठेवला. त्याचेही काय झाले, हाही प्रश्न गेले दहा दिवस ‘जैसे थे’ आहे.