जरगनगर परिसरात क्रीडांगणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:01+5:302021-03-16T04:24:01+5:30
पाचगाव : कोल्हापूर शहरातील उपनगरांपैकी विस्तृत उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरगनगर परिसरात मोठमोठे ओपन स्पेस असूनदेखील एखादे क्रीडांगण किंवा ...
पाचगाव : कोल्हापूर शहरातील उपनगरांपैकी विस्तृत उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरगनगर परिसरात मोठमोठे ओपन स्पेस असूनदेखील एखादे क्रीडांगण किंवा बागबगीचा नसल्याने मुलांना खेळण्यासाठी पर्याय शोधावा लागत आहे. तसेच महिला व वृद्धांना विरंगुळ्यासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या भागात क्रीडांगणासह गार्डन उभारण्याची मागणी होत आहे.
शहरातील जुन्या उपनगरांपैकी दक्षिणेला विस्तृत परिसरात जरगनगर वसले आहे. शहर व पाचगाव परिसराला जोडणारा दुवा म्हणून या परिसराला ओळखले जाते. गेल्या दहा-पंधरा वर्षात हा परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. त्यामुळे या परिसरात लोकांची वर्दळ वाढली आहे. संभाजीनगर निर्माण चौक ते पाचगाव आंबेडकर कमान हा मुख्य रस्ता रस्ते विकास प्रकल्पांतर्गत विकसित झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मुख्य रस्त्याचा परिसर सुस्थितीत दिसत असला तरी, कॉलनीअंतर्गत समस्या वाढल्या आहेत. कॉलनीअंतर्गत असणारे ओपन स्पेस पडून आहेत. त्यामुळे या मोकळ्या जागेवर क्रीडांगण, गार्डन उभारण्याची मागणी होत आहे.
चौकट :
मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग
या परिसरात अशियाना कॉलनी, स्वामी समर्थनगर, बळवंतनगर, अभिनंदन कॉलनी अशा अनेक छोट्या-मोठ्या कॉलन्या वसल्या आहेत. या ठिकाणी कॉलनीअंतर्गत ओपन स्पेस सोडले आहेत. परंतु या ओपन स्पेसचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जातो. बाबा जरगनगर कमानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ओपन स्पेसवर मोठ्या प्रमाणात खरमातीचे ढीग टाकल्याने या ओपन स्पेसची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. येथील अनेक महापालिकेच्या मोकळ्या जागांवर झाडेझुडपे वाढली असून कचऱ्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मोकळ्या जागांवर प्रशासनाने क्रीडांगण, गार्डन उभारावीत, अशी मागणी होत आहे.
कोट :
जरगनगरमध्ये क्रीडांगण नसल्याने खेळाडूंना पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. दूरवर खेळण्यासाठी जावे लागत असल्याने वेळ जात आहे. परिणामी, सरावासाठी अडचणी येतात. त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करून जरगनगरमधील ओपन स्पेसमध्ये एखादे सुसज्ज क्रीडांगण व बागबगीचा उभा करावा.
- संदीप पाटील (राजर्षी शाहू स्पोर्ट्स, क्रीडाशिक्षक)