कुरुंदवाडच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयांची गरज
By admin | Published: November 5, 2014 12:11 AM2014-11-05T00:11:23+5:302014-11-05T00:22:20+5:30
संस्थानकालीन भालचंद्र थिएटरचा प्रश्न : न्यायालयीन वाद येताहेत शहराच्या विकासाआड
गणपती कोळी - कुरुंदवाड -येथील संस्थानकालीन भालचंद्र थिएटर पाडून त्याठिकाणी शॉपिंग सेंटर बांधण्याच्या पालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हा प्रश्न न्यायालयीन वादात सापडला असून पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी, शहराच्या विकासासाठी राजकारण, प्रतिष्ठा बाजूला ठेवून पालिका पदाधिकारी, अधिकारी व याचिकाकर्त्यांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. न्यायालयीन वाद शहराच्या विकासाला आड येऊ शकतो.
शहर व परिसरातील लोकांना करमणुकीसाठी १९१७ साली पटवर्धन सरकारांनी भालचंद्र मेमोरियल हॉल बांधला आहे. सुमारे बारा ते पंधरा गुंठ्यांमध्ये हॉल आहे. संस्थानकाळानंतर या थिएटरचा ताबा पालिकेकडे आला. थिएटर चालविण्यासाठी ठेका दिला जातो.
शहराची वाढती लोकसंख्या, त्यांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पालिकेला करावी लागत असलेली कसरत यासाठी पालिकेने उत्पन्नवाढीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या थिएटरपासून पालिकेला फारसे उत्पन्नही मिळत नाही. अन् घरोघरी अत्याधुनिक दूरचित्रवाहिनी संच असल्याने छोट्या पडद्यांवरील सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून त्याठिकाणी शहरात भेडसावणारा तळमजल्यावर पार्किंग, दुसऱ्या मजल्यावर शॉपिंग सेंटर व अत्याधुनिक सिनेमागृह बांधण्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी पालिका सभागृहाने मंजुरी दिली होती. त्याप्रमाणे नकाशा तयार करणे, इस्टिमेट करणे, बजेट मंजूर करून घेण्याचे कामही सुरू होते.
मात्र, या इमारतीचे संवर्धन करावे यासाठी शहरातील कृष्णा लोकरे, अविनाश गुदले यांच्यासह चौघांनी पालिकेच्या ठरावाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शनिवारी, पहिली सुनावणी होऊन थिएटर पाडण्याला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे शहराच्या विकासाचा प्रश्न न्यायालयीन वादात सापडला आहे. वादातून शहराचा विकास होणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेऊन त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
शहरातील वाहन पार्किंगचा प्रश्न, खोकीधारकांना दुकानगाळ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शॉपिंग सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्नही मिटणार आहे. शिवाय पालिकेला दुकानगाळ्यांचे वर्षाला लाखो रुपयांचे अतिरिक्त सिनेमागृह बांधण्याचे इस्टिमेट आहे. त्यामुळे शहराच्या वैभवासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
- संजय खोत, नगराध्यक्ष