डॉक्टरांचे स्वास्थ्य जपण्याची गरज
By admin | Published: September 23, 2014 09:41 PM2014-09-23T21:41:19+5:302014-09-23T23:52:04+5:30
अण्णासाहेब चकोते : कुंभोजला जैन डॉक्टर्स फेडरेशनचा मेळावा
कुंभोज : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील जैन डॉक्टर्स फेडरेशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून, फेडरेशनने समाज स्वास्थ्याची जपणूक करणाऱ्या डॉक्टरांचे स्वास्थ्य जपण्याची बांधीलकी घ्यावी, असे आवाहन चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांनी केले. बाहुबली (कुंभोज, ता. हातकणंगले) येथील कोल्हापुरे सांस्कृतिक भवनात सांगली व कोल्हापूर जिल्हा जैन डॉक्टर्स फेडरेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
चकोते म्हणाले, नेहमी वैद्यकीय व्यवसायात व्यस्त असणाऱ्या डॉक्टर मंडळींचे स्वत:सह कौटुंबिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते. तथापि, जैन फेडरेशनने डॉक्टरांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबविल्यास आपले सदैव सहकार्य राहील. ‘इन्स्पायर २०१४’चे चकोते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कार्यक्रमास एंडोमेंट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, बी. टी. बेडगे, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. किरण पाटील, डॉ. अशोक बाफना, डॉ. अतित शहा, डॉ. अजित मेहता, डॉ. भरमगुडे, डॉ. पी. बी. मगदूम, डॉ. सुराना, डॉ. साधना सुराना, आदी उपस्थित होते.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एन. चौगुले यांचे तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली, डॉ. मिलिंद शहा (कोरेगाव) यांचे आर्ट आॅफ लिव्हिंग या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. बापूसाहेब पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. मिठारी, आदींनी परिश्रम घेतले. डॉ. प्रमिला पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाळ बाबर यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)