‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ची वाढ रोखण्याची गरज, शिवाजी विद्यापीठाकडून निर्मूलन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:56 PM2018-10-17T17:56:49+5:302018-10-17T18:01:09+5:30
लाल रंगाचे देखणे फूल, मोठी पाने असणारे ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ हे विदेशी वाणाचे तण अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याची वाढ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या बाजूने वेगाने होत आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : लाल रंगाचे देखणे फूल, मोठी पाने असणारे ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ हे विदेशी वाणाचे तण अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याची वाढ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या बाजूने वेगाने होत आहे.
निव्वळ फुलांमुळे दिसायला सुंदर असणारे हे तण आपल्या परिसरातील इतर गवत, झाडांची वाढ होऊ देत नाही; त्यामुळे जिल्ह्यातील पर्यावरणाला पूरक ठरत नसलेल्या या तणाची वाढ रोखण्याची गरज आहे. या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने या तणाच्या निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे.
सध्या हे तण कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठ आणि जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य, गडहिंग्लज, राधानगरी, आदी परिसरातील रस्त्यांच्या बाजूने आणि शेतीच्या बांधांवर वाढत आहे. ते जनावरे खात नाहीत. त्याच्यावर कोणताही पक्षी बसत नाही. त्याची उंची १० ते १५ फुटांपर्यंत वाढते. त्याच्या परिसरात इतर कोणतेही गवत, झाडे वाढत नाहीत.
विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण केंद्र, क्रीडासंकुल, वनस्पतिशास्त्र विभाग, मुलांचे वसतिगृह ते आठ नंबर प्रवेशद्वार, आरोग्यकेंद्र ते नाट्य व संगीतशास्त्र विभाग, कुलसचिव निवासस्थान अशा सुमारे १२ एकर परिसरात या तणाची वाढ झाली. ते जैवविविधतेच्या वाढीसाठी पूरक ठरत नसल्याने विद्यापीठाने त्याच्या निर्मूलनाची मोहीम दि. २ आॅक्टोबरपासून हाती घेतली आहे. याअंतर्गत टप्प्याटप्प्याने या तणाचे पूर्णत: निर्मूलन केले जाणार आहे. अन्य गवत, वनस्पतींच्या वाढीला मारक ठरणाऱ्या ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ची वाढ वेळीच रोखणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
जैवविविधतेला धोका नको
मेक्सिकन सनफ्लॉवर हे तण विद्यापीठाच्या परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता, त्याच्या क्षेत्रात पूर्वी येणारे गवत आणि इतर छोट्या वनस्पती या वर्षी उगवल्या नसल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे विद्यापीठातील जैवविविधतेला धोका पोहोचू नये, या उद्देशाने विद्यापीठाने ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’च्या निर्मूलनाची मोहीम सुरू केली आहे. या तणाचे क्षेत्र कमी करण्यात येत असल्याचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.
मूळचे मेक्सिकोमधील असणारे ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’ हे सूर्यफुलाच्या कुळातील तण आहे. त्याचे शास्त्रीय नाव ‘तीथोनीया रोतुण्डिफोलिया’ असे आहे. त्याचे फूल सुंदर दिसत असल्याने ते मेक्सिकोमध्ये उद्यान, बगीचा येथे लावले जाते. या फुलामुळेच आपल्या देशात ‘मेक्सिकन सनफ्लॉवर’आणण्यात आले. आपल्याकडे त्याची वाढ रस्त्याच्या बाजूला, ओसाड जागेत पावसाळ्यामध्ये होते. पावसाळ्यानंतर हे तण वाळून जाते. त्याच्यापासून पर्यावरणाला धोका नाही; मात्र हे तण त्याच्या क्षेत्रातील अन्य गवत, रोपांना वाढू देत नाही; त्यामुळे त्याचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
- डॉ. मधुकर बाचूळकर,
वनस्पतिशास्त्रज्ञ