नव्या नियमांऐवजी पदभरतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:03 AM2018-06-18T01:03:59+5:302018-06-18T01:03:59+5:30
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पातळीवरील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या नियुक्तीसाठीच्या पात्रतेबाबत नव्या नियमांऐवजी रिक्त पदे भरण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)नियुक्तीसाठी महाविद्यालय, विद्यापीठ असे दोन स्तर करण्याची आवश्यकता नव्हती; त्यामुळे आता कुठे गती घेत असलेल्या महाविद्यालयीन पातळीवरील संशोधनाला बगल मिळणार असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.
उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवरील प्राध्यापकांच्या नियुक्ती, पदोन्नतीसाठीच्या किमान पात्रतेसाठीचे नवे नियम ‘यूजीएसी’ने गेल्या चार दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यात विद्यापीठातील सहायक प्राध्यापक या किमान श्रेणीमधील पदावरील नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्णतेसह पीएच.डी. पदवी असणे बंधनकारक केले. महाविद्यालयांतील थेट नियुक्तीकरिता पीएच.डी. अथवा नेट परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट ठेवली.
नियुक्तीसाठीचे नवे नियम हे सन २०२१ पासून लागू केले जाणार आहेत. मात्र, उच्च शिक्षणातील गुणवत्ता ही प्राध्यापक पदांची भरती झाली नसल्याने घटली असल्याचा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) व इतर काही संस्थांचा अहवाल आहे. त्यामुळे पात्रतेसाठी नवे नियम आणण्याऐवजी देशातील विविध राज्यांमध्ये असलेल्या विद्यापीठ, महाविद्यालयांतील प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत यूजीसीकडून सर्वेक्षण होणे गरजेचे होते.
विद्यापीठाच्या पातळीवर पीएच.डी. बंधनकारक केली असली, तरी पीएच.डी.च्या उपलब्ध होणाऱ्या जागा, मार्गदर्शकांची संख्या लक्षात घेता, या पातळीवरील नियुक्तीसाठी आगामी तीन वर्षांमध्ये कितीजण पात्रता पूर्ण करणार हा प्रश्नच आहे. पीएच.डी.च्या पर्यायांमुळे महाविद्यालयांच्या पातळीवर
संशोधन सुरू झाले असून, ती आता गती घेत असतानाच ‘नेट’च्या पर्यायामुळे त्याला बगल मिळण्याची शक्यता आहे.
९५ प्राध्यापक पीएच.डी.धारक
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये कायमस्वरूपी २६२ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या १५२ कार्यरत असून त्यांतील ९५ प्राध्यापक हे पीएच.डी. पदवीधारक आहेत. भरती बंदीमुळे ११० पदे रिक्त आहेत.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
अनुदानित महाविद्यालयांची संख्या : ११७१
विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांची संख्या : सुमारे ३५००
राज्यातील सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा : ९५११
कोल्हापूर विभागांतर्गत सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा : ११००
राज्यातील दहा विद्यापीठांतील प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा : ८६४