धान्यांची शास्त्रशुद्ध साठवण गरजेची
By Admin | Published: October 13, 2015 12:30 AM2015-10-13T00:30:48+5:302015-10-13T00:39:29+5:30
अशी कोठारे महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळे पुरविते. अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत पत्र्याच्या कोठ्या तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला अनुदान देण्यात आले
शिवाजी सावंत - गारगोटी--शेतकरी पीक उत्पादन वाढविण्यासाठी जितके प्रयत्न करतात, तितके धान्य साठवणूक करताना काळजी घेताना दिसत नाही. परिणामी उत्पादित झालेल्या धान्यास किडे लागण, उंदीर, बुरशीमुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उत्पादित झालेल्या धान्यांची साठवणूक कशी करावी याची माहिती असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी खरीप पिकांची कापणी, मळणी सुरू आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, कुळीथ अशा धान्यांचा त्यामध्ये समावेश आहे. दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग करण्यात शेतकरी अग्रेसर आहेत. नवनवीन संशोधित संकरित वाणांची निवड पेरणीसाठी केली जात आहे. एका दाण्याचे शंभर दाणे करण्याचे कसब शेतकऱ्यांकडे आहे. सध्या देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून, देशातील जनतेची भूक भागवून धान्य निर्यात करत आहे. मात्र उत्पादन घेताना जितका जागरूक असतो, तितका तो साठवणूक करताना काळजी घेत नाही. धान्याच्या साठवणुकीसाठी तंत्रशुद्ध उपाय न योजल्याने देशातील जवळपास सात हजार कोटी रुपयांच्या धान्याची नासाडी होते. यात महाराष्ट्रात सहाशे कोटी रुपयांचे नुकसान होते, असे तज्ज्ञाचे मत आहे. हजारो कोटी रुपयांच्या धान्याची योग्य ती दक्षता न घेतल्याने नासाडी होते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:पुरती काळजी घेतल्यास संपूर्ण देशातील अन्नधान्याची नासाडी थांबू शकते. कारण नुकसान टाळणे म्हणजे उत्पादन वाढल्यासारखे आहे.
मळणीनंतर शेतकरी हे धान्य वाळवतो. स्वत:साठी लागणारे अन्न धान्य जास्त वाळवतो, तर विक्रीसाठी असल्यास तो तितकीच काळजी घेताना दिसत नाही. काही वेळेस मळणीनंतर केवळ वारे देऊन भाताची विक्री केली जाते. व्यापारी हे धान्य गोदामात साठवतात. मात्र, सोयाबीनची या काळात हवेत आर्द्रता आणि कोंदट तापमान असल्याने किडीच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण असते. त्यामुळे वातावरणात धान्याची नासाडी होण्याचा वेग तीव्र असतो. जिवाणू आणि बुरशी यासारखे सूक्ष्मजंतू धान्यातील पोषक द्रव्ये नष्ट करतात. विषारी व शरीरविघातक पदार्थ सोडतात. यामुळे धान्याचा रंग, चवीत बदल होतो. असे धान्य खाण्यासाठी अयोग्य होते. शरीराला अन्नातून मिळणारे पिष्टमय पदार्थ, स्निग्ध, विविध खनिजे, जीवनसत्त्वे ही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. अन्न दर्जेदार आणि चवदार राहण्यासाठी साठवणूक करताना योग्य काळजी घ्याल, तर अन्न कसदार राहील. तंत्रशुद्ध साठवणुकीच्या साध्या व सोप्या पद्धती आहेत. शिवाय त्या कमी खर्चिक असल्याने सर्वांना परवडतील अशा आहेत. या पद्धतीने पुढील वर्षाचे बियाणेसुद्धा सुरक्षित करता येईल.धान्य काढणीनंतर वाळवताना १0 टक्के ओलावा शिल्लक देऊन धान्य वाळवावे. त्या धान्यातील काडी कचरा, खडे, लहान दगड, माती, रेती, काढून घ्यावी. यासाठी वारे देणे, मोठे खडे वेचणे अथवा चाळणे आवश्यक आहे. या धान्याची तपासणी करावी. त्यावर प्रभावी अशी सूक्ष्मजंतू नियंत्रक उपाययोजना करावी. त्यामुळे धान्य अधिक काळ टिक ण्यास मदत होईल. साठवणुकीसाठी आधुनिक कोठारांचा विकास करण्यात आला आहे. कोठारात तापमान नियंत्रित करता येत असल्यामुळे आर्द्रता नियंत्रित होते. पत्रा व सिमेंटची आधुनिक कोठारे घरच्या घरी थोड्या अन्नधान्याकरिता वापरता येऊ शकतात. अशी कोठारे महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळे पुरविते. अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत पत्र्याच्या कोठ्या तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला अनुदान देण्यात आले आहे. धान्य सुरक्षिते- संबंधी अधिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या खाद्य मंत्रालयामार्फत महाराष्ट्रातील पुणे येथील दापोडी येथे प्रशिक्षण कार्यालय आहे. हे कार्यालय शेतकरी, व्यापारी, विस्तार कर्मचाऱ्यांना धान्य सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण देते.कृषी उत्पादनाच्या प्रमुख तीन भागांमध्ये विभागणी होत असते. प्रथम पेरणीपूर्व मशागत, द्वितीय पेरणी ते कापणीपर्यंत व तृतीय कापणीनंतरची कामे. शेतकरी पहिल्या दोन भागांना महत्त्व देतो, पण खरे महत्त्व हे कापणीनंतरच्या कामास देणे आवश्यक आहे. कारण चांगला भाव मिळेपर्यंत धान्याची साठवणूक केल्यास त्याचा आर्थिक फायदा होईल. देशातील जवळपास १0 टक्के अन्नधान्य व २५ ते ४0 टक्के भाज्या व फळे योग्य साठवणुकीच्या अभावाने नष्ट होतात.
तक्ता (नमुना दाखल)
नुकसानीचे प्रकारनासाडीचे प्रमाण
कापणीच्या वेळी१.८३
सफाई0.९२
उंदीर, पक्षी३.३५
अयोग्य साठवणुकीमुळे किडे२.५५
धान्यातील आर्द्रता0.६८
एकूण९.३३
हा तक्ता पाहता जवळपास १0 टक्के आर्थिक नुकसान होते. त्यामुळे योग्य वेळी कापणी, वाळवणी आणि साठवणूक केल्यास नुकसान घटेल. आगामी काळात शेती ही व्यवसाय म्हणून केल्यास तोटा कमी होईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन भुदरगडचे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी केले आहे.