वेगाची नशा, आयुष्याची दशा, तरुणाईच्या वेगावर सामूहिक नियंत्रणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 02:47 PM2019-11-09T14:47:45+5:302019-11-09T14:53:14+5:30
शहरातील दोन युवकांचा भरधाव वेगाने बळी घेतल्यानंतर आता तरुणाईच्या वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही वेगाची नशा, आयुष्याची दशा करून टाकत असताना अनुत्तरित असणारे अनेक प्रश्नही निर्माण करीत आहे.
कोल्हापूर : शहरातील दोन युवकांचा भरधाव वेगाने बळी घेतल्यानंतर आता तरुणाईच्या वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही वेगाची नशा, आयुष्याची दशा करून टाकत असताना अनुत्तरित असणारे अनेक प्रश्नही निर्माण करीत आहे.
विविध कंपन्यांनी तरुणाईला आकर्षित करून घेण्यासाठी काढलेली स्पोर्टस मॉडेल, आपल्याकडील रस्त्यांची असलेली परिस्थिती, वाहतुकीचे नियम तोडण्याकडेच असलेला युवक-युवतींचा कल यातूनच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असून अपघात होणारच असे म्हणून न थांबता या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचीच गरज निर्माण झाली आहे.
वास्तविक दहावीनंतर मुलामुलींना दुचाकी गाड्यांची अधिकच गरज असताना आपल्याकडे मात्र ज्या सीसी गाड्यांसाठी परवाना देणे शक्य आहे, अशा सीसीच्या गाड्याच बाजारात उपलब्ध नाहीत, हे वेगळेच वास्तव आहे. दुसरीकडे, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय घरांतील मुलांमध्ये स्पोर्टस बाईक्सची मोठी क्रेझ असून, यासाठी त्यांची पालकांकडे सातत्याने मागणी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
अशा प्रकारची गाडी जर आपल्याला घेऊन दिली नाही तर मग मित्रांच्या गाड्या चालविण्याचे प्रकार घडतात. गुरुवार (दि. ७)चा अपघात झाला तेव्हाही ठार झालेला मंदार पाटील हा मित्राचीच गाडी चालवीत होता. एरवी साध्या दुचाकी गाड्याही युवक भरधाव वेगाने चालवत असल्याचे सर्रास चित्र कोल्हापूर शहरामध्ये दिसून येत आहे.
डाव्या बाजूने गाडी पुढे नेणे, इंडिकेटर्सचा वापर न करणे, पुढच्या वाहनांनी काय इंडिकेटर्स दिले आहेत याची दखल न घेणे, गाडी रेस करीत पळविणे असे सर्रास प्रकार तरुणांकडून सुरू असतात. अनेकदा रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या नागरिकांनाही या युवकांच्या भरधाव वेगाचा त्रास होत असतो. शेजारून ज्या पद्धतीने हे युवक गाडी घेऊन घासून जातात, ते पाहून जीव घाबरतो.
याला युवतीदेखील अपवाद नाहीत. तोडांला स्कार्फ घट्ट बांधल्याने अनेक मुलींना पाठीमागून वाजविले जाणारे हॉर्न ऐकू जात नाहीत. मुलीही सर्रास ट्रिपलसीट बसून जातात. या सर्व बाबींचा विचार करून पोलिसांनीही त्यांची नेहमी सुरू असणारी कारवाई आणखी कडक करण्याची गरज आहे.
दीड वर्ष मागूनही गाडी दिली नव्हती
गुरुवारी झालेल्या अपघातात ठार झालेल्या मंदार पाटील यांच्या घरी शुक्रवारी भेट दिली असता केवळ सुन्नपणा अनुभवण्यास आला. ‘गेले दीड वर्ष मंदार स्पोर्टस बाईक मागत होता. परंतु या गाड्या भन्नाट पळतात; परंतु नियंत्रित होत नाहीत, याची मला माहिती असल्याने मी त्याला गाडी घेऊन दिली नव्हती. आता मित्राची गाडी चालविताना अपघात झाला आणि त्यात तो गेला. आता आईवडील म्हणून आम्ही काय करायचं?’ असा प्रश्न मंदारचे वडील मधुसूदन पाटील यांनी विचारला, ज्याला काहीच उत्तर नव्हते. मंदार याचा मोठा भाऊ जहाजावर असून १० दिवसांनंतर तो कोल्हापूरला येणार आहे.
दिसेल तिथे चापण्याची गरज
वेगवान तरुणाईला दिसेल तेथे चापण्याची कामगिरी आता केवळ पोलिसांनाच करून चालणार नाही. नागरिकांनीही अशा युवकांना किमान त्याच ठिकाणी सौम्य शब्दांत का असेना, काही सांगण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयांसह घरातूनही याबाबत सातत्याने प्रबोधन करीत राहणे हाच यावरचा उपाय आहे.