जैन धर्माच्या शिकवणीची गरज--श्रीमंत कोकाटे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:44 AM2017-09-23T00:44:33+5:302017-09-23T00:45:32+5:30
जयसिंगपूर : सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात जगामध्ये प्रांतिक, जातीय, भाषेवर हल्ले होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात जगामध्ये प्रांतिक, जातीय, भाषेवर हल्ले होत आहेत. याला रोखायचे असेल तर हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या जैन धर्माच्या शिकवणीची आज गरज निर्माण झाली आहे. मराठी जैन साहित्यामुळे महाराष्ट्रात समता, अहिंसा, सहिष्णुता आणि पुरोगामी विचार लोकांच्यात रुजावा, असा आदर्श निर्माण होऊन तो सुवर्ण अक्षराने लिहिला जावा, अशी अपेक्षा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र जैन साहित्य परिषद, कोल्हापूर यांच्यावतीने येथील चौथ्या गल्लीतील सोनाबाई सुरेंद्र इंगळे व इंद्रध्वज सभागृहामध्ये जैन साहित्य संमेलन जयसिंगपूर यांच्यावतीने२२ व्या मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
डॉ. लीलावती शहा होत्या. यावेळी श्रीमंत कोकाटेंसह मान्यवरांच्या हस्ते मराठी जैन साहित्य संमेलनाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले.
डॉ. लीलावती शहा म्हणाल्या, जैन धर्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड याला कधीच थारा दिला नाही. जैन साहित्यिक हे प्रेरणादायी असून, तरुण लेखकांनी जैन धर्माचा खरा इतिहास सांगावा.
अशा प्रकारच्या साहित्य संमेलनात तरुणांचा सहभाग व्हावा, लेखकांनी वाचन आणि लिखाणातून नवे साहित्य निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहर हे अहिंसा प्रवतेने गुण्यागोविंदाने नांदत आहे. सर्व जाती धर्मांना येथे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून समाज प्रबोधनाचा निर्णय घेतला आहे.
जैन साहित्य परिषदेचे मुख्य सचिव डॉ. रावसाहेब पाटील यांनी स्वागत, तर सचिव प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प. पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामीजी कोल्हापूर, प. पू. स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन महास्वामीजी नांदणी यांचे आशीर्वचन झाले. सागर चौगुले यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, शैलेश चौगुले, प्रकाश झेले, मोहन पाटील, विजय आवटी, महावीर अक्कोळे, राजेंद्र नांद्रेकर, आदिनाथ कुरुंदवाडे, भालचंद्र वग्याणी, आदी उपस्थित होते.
जयसिंगपूर येथे शुक्रवारी २२ व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. श्रीमंत कोकाटे, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय पाटील-यड्रावकर, सागर चौगुले, दादा पाटील-चिंचवाडकर, प. पू. स्वस्तिश्री भट्टारक डॉ. लक्ष्मीसेन महास्वामीजी, प. पू. स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन महास्वामीजी, भालचंद्र वग्याणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.