विजेचा नवीन स्रोत शोधणे काळाची गरज
By admin | Published: September 16, 2014 12:18 AM2014-09-16T00:18:56+5:302014-09-16T00:38:24+5:30
शिवराम भोजे : विश्वेश्वरय्या मेमोरियल अवॉर्ड अभियंता श्रीकांत माने यांना मरणोत्तर प्रदान
कोल्हापूर : जगात ज्या देशात विजेचा वापर जास्त होतो, त्या देशाची प्रगती होते. भारताचा विचार करता सव्वाशे कोटी लोकसंख्या आहे. भविष्याचा विचार करता लोकसंख्या १६० कोटी होणार आहे. त्यामुळे नवीन ऊर्जेचे स्रोत शोधणे ही काळाची गरज बनली आहे. जणू हे मोठे आव्हानच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी केले.
इंजिनिअर्स फौंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने अभियंता दिनानिमित्त देण्यात येणारा ‘सर भारतरत्न डॉ.
एम. विश्वेश्वरय्या मेमोरिअल अवॉर्ड’ ज्येष्ठ अभियंता स्वर्गीय श्रीकांत
माने यांना मरणोत्तर प्रदान आणि सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन व इंजिनिअर्स को-आॅप. के्रडिट सोसायटी यांनी नवीन बांधलेल्या वातानुकूलित सभागृहाला ‘अभियंता श्रीकांत माने सभागृह’ असे नाव देण्याच्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘महावितरण’चे संचालक अभिजित देशपांडे
होते.
डॉ. भोजे म्हणाले, ज्या देशाचा विजेचा वापर अधिक, त्या देशाची प्रगतीही झपाट्याने होते. भारताचा विचार करता, लोकसंखेची सव्वाशे कोटींहून १६० कोटींकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे भविष्यात विजेचा तुटवडा जाणवणार हे निश्चित आहे. याकरिता नवीन ऊर्जेचा स्रोत शोधणे काळाची गरज बनली आहे. अणुऊर्जा निर्मितीचे महत्त्व व त्यासंबंधीचे सर्वसामान्यांमध्ये असलेले गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. स्वर्गीय श्रीकांत माने यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, सध्या महावितरण कंपनीला स्पर्धेच्या युगात मानेसाहेबांसारखी दूरदृष्टी असणाऱ्या अभियंत्यांची नितांत आवश्यकता आहे.
हा अवॉर्ड डॉ. भोजे यांच्या हस्ते स्वर्गीय श्रीकांत माने यांच्या पत्नी अरुणा माने व कन्या श्रेया माने आणि तेजस्विनी नलवडे यांनी स्वीकारला. सोसायटीचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी प्रास्ताविक, तर विजय राणे यांनी आभार मानले.
यावेळी पारेषण कंपनीचे मुख्य अभियंता गणपत मुंडे, ‘एसईए’चे अध्यक्ष रामेश्वर माहुरे, राजाराम शितोळे, एसईएचे सचिव सुनील जगताप, दीपक कुमठेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)