स्त्रीत्व जपणं काळाची गरज- स्मिता जयकर
By Admin | Published: February 7, 2017 12:37 AM2017-02-07T00:37:41+5:302017-02-07T00:37:41+5:30
पेठवडगावमध्ये कल्याणी महोत्सवाची सांगता
पेठवडगाव : स्त्रीत्व जपणं काळाची गरज बनली आहे. यामध्ये वायू, पाणी, हवा, धरती व लक्ष्मी ही स्त्रीत्व आहेत. महिलांनी स्त्रीत्वांची जपणूक करून सृष्टीचे पावित्र्य राखावे, असे आवाहन सिनेअभिनेत्री स्मिता जयकर यांनी केले.
येथील कल्याणी महोत्सवाच्या सांगता सभारंभप्रसंगी स्मिता जयकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा विद्या पोळ होत्या. यावेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, नगरसेविका अनिता चव्हाण, संगीता मिरजकर, जवाहर सलगर प्रमुख उपस्थित होते. खासगी वाहिनीवरील ‘तुज्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेता राणा (हार्दिक जोशी) याने महिलांशी संवाद साधला.
स्मिता जयकर म्हणाल्या, स्त्रीशक्तीमधील ताकद ओळखा. प्रत्येक स्त्रीमधील शक्ती जागृत झाल्यास समाजव्यवस्था सुधारते. महिलांच्या जीवनात परिवर्तनाची धडपड विद्या पोळ करीत आहेत. त्यांच्या पाठीशी महिलांनी राहावे. तसेच महिलांनी स्वत:मध्ये सुधारणा केल्यास जग बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रेमाची जर्नी या फिल्ममधील कलाकारांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर संदीप पंचवाडकर यांचा जीवन की यादगार लम्हे हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. यावेळी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. अनुक्रमे निकाल असा -फिश पदार्थ- उर्मिला पाटील, तेजस्विनी उंडाळे, माधुरी कांबळे, मटन पदार्थ - पायल गोणी, प्रिया पोळ, चिकन पदार्थ - नीलम दबडे, शुभांगी भंडारी, सुजाता माने, शुभांगी चव्हाण. शाकाहारी-उकडलेले पदार्थ - पायल गोणी, कांचन पाटील, शुभांगी भंडारे, सॅलेड व फ्रूट डेकोरेशन अनुक्रमे - उर्मिला पाटील, स्नेहल शिखरे, नीलम दबडे, लायमा शिकलगार. परीक्षक संगीता देवकर होत्या. कल्याणी बझारची बक्षिसे पूनम होनोले, राजेंद्र पाटील यांना मिळाली, तर मानाची कल्याणी पैठणी अश्विनी खटावकर यांना प्राप्त झाली. (प्रतिनिधी)