राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ५ लाखांचा करण्याची गरज, शिक्षणक्षेत्रातून मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:11 PM2024-08-29T12:11:01+5:302024-08-29T12:11:20+5:30

बक्षिसाच्या रकमेबाबत कंजुषी का?

Need to make National Ideal Teacher Award 5 lakhs, demand from education sector  | राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ५ लाखांचा करण्याची गरज, शिक्षणक्षेत्रातून मागणी 

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ५ लाखांचा करण्याची गरज, शिक्षणक्षेत्रातून मागणी 

पोपट पवार 

कोल्हापूर : केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराची मंगळवारी घोषणा झाली. यात राज्यातील सागर बागडे आणि मंतैय्या बेडके या दोन शिक्षकांना २०२४ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवरील महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्यानंतर या दोन्ही शिक्षकांवर राज्यभरातन अभिनंदनांचा वर्षाव होत असला, तरी पुरस्काराच्या तुलनेत या पुरस्काराची रक्कम अत्यंंत कमी असल्याने केंद्र सरकार शिक्षकांचे अवमूल्यन कधी थांबवणार?, असा सवाल शिक्षणप्रेमींमधून उपस्थित झाला. ५० हजारांऐवजी हा पुरस्कार ५ लाख रुपयांचा करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून जोर धरू लागली आहे.

शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना केंद्र शासनाच्या वतीने ५ सप्टेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार असल्याने पुरस्कारकर्त्याचा मानसन्मान अपसूकच वाढतो. मात्र, या पुरस्काराची रक्कम जिल्हा पातळीवर दिल्या जाणाऱ्या पुरस्काराइतकी आहे. त्यामुळे ‘बडा घर पोकळ वासा’, अशी अवस्था या राष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराची झाली आहे. एकीकडे नवे शैक्षणिक धोरणच देशाला महासत्ता बनवणार असल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढणार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्याच शिक्षकांचा योग्य ‘सन्मान’ मात्र ठेवला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिक्षकांवरच अन्याय का ?

देशातील ५० शिक्षकांना प्रत्येक वर्षी हा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. त्यासाठी राज्यस्तरीय व केंद्रीय पुरस्कार समितीद्वारे निवड केली जाते. ज्याचा सदस्य म्हणून केंद्र सरकारचा नामनिर्देशित व्यक्ती असतो. समितीने शिफारस केलेल्या शिक्षकांची नावे गुणवत्तेनुसार राज्य सरकार केंद्राला पाठवते. त्यानंतर केंद्र सरकार गुणवत्तेच्या आधारावर अंतिम निवड करते. राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार असल्याने कोटेकोरपणे त्याची निवड प्रक्रिया पार पाडली जात असताना, रकमेच्या बाबतीत मात्र सरकार ‘कंजूष’पणा दाखवत आहे. विशेष म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनेक पुरस्कारांची रक्कम ही लाखांच्या घरात आहे. मात्र, शिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबत सरकार हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.


शिक्षकांचा केंद्र शासनाकडून होणारा सन्मान हा गौरव आहे, त्यामुळे त्यांच्या पुरस्काराची रक्कमही वाढवण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे नक्की करू. - शाहू छत्रपती, खासदार, कोल्हापूर.
 

अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापूरच्या सागर बगाडे यांना मिळाला, ही अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्काराची रक्कम अत्यंत अल्प आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची रक्कम कमीत कमी दहा लाख रुपये करावी, अशी मागणी मी केंद्राकडे करणार आहे. - धनंजय महाडिक, राज्यसभा सदस्य.

राष्ट्रीय आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना देण्यात येणारी ५० हजार रुपयांची रक्कम अत्यंत अल्प आहे. पूर्वी या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ दिली जात होती. शिक्षकांना प्रोत्साहन द्यायचे असेल, तर त्यांना दोन वेतनवाढ व भरीव रक्कम देण्यात यावी. शिवाय टोल, रेल्वे यामध्येही त्यांना सवलत मिळावी. - जयंत आसगावकर, शिक्षक आमदार.

Web Title: Need to make National Ideal Teacher Award 5 lakhs, demand from education sector 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.