जलसंवर्धन काळाची गरज- डी. टी. शिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:43 PM2017-09-22T23:43:04+5:302017-09-22T23:46:12+5:30
शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय युवा परिषदेला प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क, --कोल्हापूर : सध्याची स्थिती पाहता, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी येथे केले.
भारतीय जलसंस्कृती मंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर होते. या परिषदेचा विषय ‘जलस्थापत्य : इंजिनिअरिंग अॅँड आर्किटेक्चर’ असा आहे. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पाण्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. विद्यापीठ हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे. अध्यक्ष डॉ. देशकर म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब साठवून तो वाचविल्यास पाणीटंचाई जाणविणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात पडणारा पूर्ण पाऊस साठविल्यास त्यातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल. या कार्यक्रमास पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, सतीश माने, आदी उपस्थित होते. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. सतीशराज जगदाळे यांनी आभार मानले.
कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातील भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सतीशराज जगदाळे, सतीश माने, पी. डी. राऊत, डी. टी. शिर्के, जयदीप बागी, अनिलराज जगदाळे उपस्थित होते.