कोरोनानंतरच्या मुलांच्या भावजीवनावर लेखन होणे गरजेचे : किरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:58 PM2021-05-24T17:58:22+5:302021-05-24T18:04:34+5:30
literature Online Kolhapur : कोरोनानंतरचे मुलांचे भावजीवन यावर आज लेखन होणे गरजेचे आहे. ज्या साहित्यामध्ये बालसाहित्य असतं त्यामध्ये वाचणारी पिढी घडते. बालसाहित्य म्हणजे नुसतं फुल नाही तर त्या फुलाचा सुगंध आहे. नुसता समुद्र नाही तर समुद्राच्या लाटा देखील आहेत, ज्याला सुगंध घेता येतो, लाटा झेलता येतात असा माणूस चांगली बालसाहित्याची निर्मिती करू शकतो, असे मत 'किशोर' या मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : कोरोनानंतरचे मुलांचे भावजीवन यावर आज लेखन होणे गरजेचे आहे. ज्या साहित्यामध्ये बालसाहित्य असतं त्यामध्ये वाचणारी पिढी घडते. बालसाहित्य म्हणजे नुसतं फुल नाही तर त्या फुलाचा सुगंध आहे. नुसता समुद्र नाही तर समुद्राच्या लाटा देखील आहेत, ज्याला सुगंध घेता येतो, लाटा झेलता येतात असा माणूस चांगली बालसाहित्याची निर्मिती करू शकतो, असे मत 'किशोर' या मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी व्याख्यानमालेत ते बोलत होते. या 'बालसाहित्य व्याख्यानमाले 'अंतर्गत केंद्रे यांनी 'बालसाहित्यिकाकडून अपेक्षा 'या विषयावर आपले मत व्यक्त केले. या आभासी व्याख्यानमालेचे संयोजन गोविंद पाटील, वि. द. कदम, प्रा. विनोद कांबळे यांनी केले.
बालसाहित्य हे बालमनाला अलगद स्पर्शून जाणारं असावं असे सांगून किरण केंद्रे म्हणाले, हलक्याफुलक्या शब्दकळांनी संस्कार संपन्न करणार असं साहित्य येणे गरजेचे आहे. बालसाहित्य आणि चित्र यांची सांगड घालण्याचं काम मुलं करत आहेत. बालसाहित्य हे सहजतेने घेणारी गोष्ट नाही. सोपं लिहिणं सर्वात कठीण असतं हे बालसाहित्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. साहित्याचा उद्देशात माहिती, मूल्यं आणि शहाणपण हे आहे. बालसाहित्यामधून यातला नेमका उद्देश मुलांना व्यापक दृष्टिकोनातून सांगण्याची गरज आहे.
मराठी बालसाहित्याची उपेक्षा
महाराष्ट्रामध्ये मराठी बालसाहित्याची उपेक्षा झालेली दिसते. या साहित्याकडे जितक्या गंभीरतेने मराठी साहित्याने बघायला पाहिजे होतं तितकं बघितलं नाही. जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत बालसाहित्यामध्ये नाविन्यपूर्ण लेखन येणार नाही. 'किशोर' मासिकाचे काम करत असताना रोज अनेक प्रकारचे साहित्य येतं. मात्र यातलं नेमकं बालसाहित्य आम्ही प्रसिद्ध करीत असतो, असेही त्यांनी सांगितले.