कोरोना नियंत्रणासाठी युथ टास्क फोर्सची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:56+5:302021-05-01T04:22:56+5:30
कोल्हापूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात स्वतचा वेळ आणि श्रम देण्यासाठी तयार असणाऱ्या युथ ...
कोल्हापूर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात स्वतचा वेळ आणि श्रम देण्यासाठी तयार असणाऱ्या युथ टास्क फोर्सची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि जागतिक साथरोग तज्ज्ञ डॉ. राजन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मुळचे संकेश्वर येथील असलेले डॉ. पाटील सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले हे मत व्यक्त केले आहे. उद्योजकतेमध्ये पारंपरिक कल्पनांना फाटा देऊन नवीन संकल्पना अंमलात आणण्याची ही वेळ असून यापुढच्या काळात मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन निर्मिती या उद्योगांमध्ये नावीन्य आणावे लागणार आहे. केवळ नफ्यासाठी अशा उद्योगांचा विचार न करता सामाजिक बांधिलकी ही विचार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
युवा पिढी ही तंत्रस्नेही आणि समाजासाठी काम करण्याची वृत्ती असलेली असून त्यांच्या शक्तीचा योग्य विनियोग करण्यासाठी अशा टास्क फोर्सची गरज आहे. तामिळनाडू, चेन्नईमध्ये महामारी आणि साथीचे रोग, तयारी आणि प्रतिसाद कार्यक्रम अशी संकल्पना राबवली जाते. त्याच धर्तीवर या टास्क फोर्सची गरज आहे असे डॉ. पाटील यांचे मत आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट जोराची असून शासकीय पातळीवर देखील अशा काळात मर्यादा पडतात. याचा विचार करून अशा संकटाला तोंड देण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती देणारा युथ टास्क फोर्स या काळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो. यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन होण्याची गरज आहे.
चौकट
जन्मगाव संकेश्वर, आजरा आजोळ
डॉ. राजन पाटील हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरचे आहेत. आजरा हे त्यांचे आजोळ आहे. कोल्हापूर येथील बसव केंद्राचे चंद्रशेखर बटकडली, आजरा येथील तात्यासाहेब बटकडली, राजाभाऊ बटकडली यांचे ते भाचे आहेत. डॉ. पाटील यांचे वडील बेंगलोर येथील डिफेन्स डेअरी फार्ममध्ये कार्यरत होते. त्यामुळे पाटील यांचे शिक्षणही बेंगलोर येथे झाले आहे.