'शेतकऱ्याच्या लेकी'ला ५ महिन्यात सरकारी नोकरीच्या ६ पदांची लॉटरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 01:26 PM2024-07-13T13:26:37+5:302024-07-13T13:26:37+5:30

'गंगापूर'ची कन्या : 'गडहिंग्लज'च्या वाचनालयात १० तास अभ्यास, जिद्दीने मिळवले यश

Neelam Pramod Farakte from Bhudargad taluka of Kolhapur district was selected for six posts in five months in various MPSC examinations | 'शेतकऱ्याच्या लेकी'ला ५ महिन्यात सरकारी नोकरीच्या ६ पदांची लॉटरी!

'शेतकऱ्याच्या लेकी'ला ५ महिन्यात सरकारी नोकरीच्या ६ पदांची लॉटरी!

- राम मगदूम

गडहिंग्लज : प्रापंचिक जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळतानाच येथील गडहिंग्लज नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात दररोज १० तास अभ्यास करून तिने जिद्दीने 'एमपीएससी'च्या विविध परीक्षेत मोठे यश मिळविले. त्यामुळे एकाचवर्षी अवघ्या ५ महिन्यात सरकारी नोकरीतील ६ पदांसाठी तिची निवड झाली आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळच्या गंगापूर येथील शेतकरी कुटुंबातील या जिद्दी लेकीचे नाव आहे, निलम प्रमोद फराकटे.

तिचे प्राथमिक शिक्षण गंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर दहावी पर्यंतचे शिक्षण श्रीराम हायस्कूलमध्ये झाले. गारगोटीच्या 'आयसीआरई’मधून डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनची पदविका घेतली. लग्नानंतर गडहिंग्लजच्या  डॉ. ए. डी. शिंदे तंत्रनिकेतनमधून सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी व पदविका घेतली.पती इंजि.प्रमोद हे गडहिंग्लज नगरपालिकेत पंतप्रधान आवास योजना विभागाकडे कंत्राटी सेवेत आहेत. त्यांच्या प्रेरणेतूनच तिने सिव्हील इंजिनिअरिंग क्षेत्रात स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्याचा निर्णय घेतला अन् जिद्दीने तडीसही नेला.

२ फेब्रुवारी, २०२४ पासून ती मुंबई येथे ‘आयटीआय’मध्ये निदेशक म्हणून कार्यरत आहेत.दरम्यान, जलसंपदा विभागातील आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, रत्नागिरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता तर सातारा व सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर तिची निवड झाली आहे.

फेब्रुवारी ते जून २०२४ या कालावधीत ६ सरकारी नोकऱ्यांची संधी तिला चालून आली आहे.लवकरच ती रत्नागिरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता (वर्ग-२) या पदावर रुजू होणार आहे. गंगापूर हेच तिचे माहेर व सासर आहे. तिला शेतकरी वडील आनंदराव नरतवडेकर आई‌ सुचिता,सासरे जोतिराम फराकटे, सासू आनंदी यांचे प्रोत्साहन व पाठबळ आहे.

दुसरीत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या नातू 'दर्शिल'चा सांभाळही तेच करतात.शिक्षणासाठी /नोकरीसाठी लेकीला / सूनेला प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्या या शेतकरी कुटुंबाबरोबरच स्वतः कंत्राटी सेवेत असतानाही सरकारी नोकरीसाठी पत्नीला मनापासून साथ देणाऱ्या 'प्रमोद' यांचेही सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.

लग्न ठरले अन् पतीची नोकरी गेली!
निलमचे पती प्रमोद हे गारगोटी पंचायत समितीमध्ये एका शासकीय योजनेच्या कंत्राटी पदावर नोकरीला होते. परंतु,लग्नापूर्वी एक आठवडाअगोदर ती योजना बंद झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले.त्याची खंत तिच्या मनात होती. त्या अस्वस्थतेतूनच तिने हे यश मिळविले आहे.

बाळंतपणानंतर ५ व्या दिवशी परीक्षा!
२०१७ मध्ये त्यांना मुलगा झाला. बाळंतपणानंतर पाचव्या दिवशी झालेली परीक्षादेखील तिने दिली.'वर्ग एक'ची सहाय्यक अभियंतापदाची संधी अवघ्या ६ गुणांनी हुकली. दरम्यान, कोरोनामुळे ३ वर्षे स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत.तरीदेखील तिने अखंडपणे अभ्यास सुरूच ठेवला होता.

Web Title: Neelam Pramod Farakte from Bhudargad taluka of Kolhapur district was selected for six posts in five months in various MPSC examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.