अँटिजनमध्ये निगेटिव्ह, आरटीपीसीआर पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:30+5:302021-07-02T04:16:30+5:30
कोल्हापूर : कोरोना आजाराच्या निदानासाठी करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह तर आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असा अनेक जणांना अनुभव ...
कोल्हापूर : कोरोना आजाराच्या निदानासाठी करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह तर आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असा अनेक जणांना अनुभव येत आहे. यामुळे अँटिजन चाचणीवरच प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. यासंबंधीच्या सार्वत्रिक तक्रारींमुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रॅपिड अँटिजन टेस्टच्या किटची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या होत्या.
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. समूह संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोना नियंत्रणासाठी तपासणी, रूग्ण शोध मोहीम व्यापकपणे राबवली जात आहे. रुग्णसंख्या जास्त असलेल्या गावांत रॅपिड अँटिजन चाचणी केली जात आहे. याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपासून ते अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक, व्यापारी बँका, पतसंस्था, सेवा संस्था, दूधसंस्थांच्या ठिकाणी काम करणाऱ्यांची अँटिजन तपासणी शासकीय आरोग्य यंत्रणेकडून केली जात आहे. पण या चाचणीत अनेकांचे निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह येत आहे.
अँटिजनचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरही कोरोनाची लक्षणे कमी न झाल्याने अनेक जणांमध्ये उघड झाले आहे. याउलटही अनुभव येत काही जणांना येत आहे. अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआरचा अहवाल निगेटीव्ह आल्याचेही उदाहरणे आहेत. यामुळे अँटिजन तपासणीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अँटिजनमध्ये नेमकेपणा नसल्याने कोरोना रुग्णांच्या तपासणीत वेळ जात आहे. परिणामी उपचारास विलंब होत आहे.
कोट
सरकारच्या आरोग्य यंत्रणेकडून मी सकाळी अँटिजन तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. खोकला, ताप, अंगदुखी कायम राहिली. यामुळे दुपारी आरटीपीसीआर करून घेतले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कोरोनाचे उपचार घेतले.
एक रुग्ण
कोट
अँटिजन ही रॅपिड टेस्ट असते. समूह संसर्ग आणि त्वरित अहवाल मिळण्यासाठी ही उपचार पद्धती अवलंबली जाते. पण या तपासणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तो रुग्ण पॉझिटिव्हच असतो. पण दोन दिवसांनी तपासणी केल्यास किंवा संशयित रुग्ण तरुण असल्यास अँटिजन पॉझिटिव्ह असतानाही आरटीपीसीआरचा अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. अँटिजन निगेटिव्ह आल्यानंतरही कोरोनाची लक्षण कायम असतील तर तातडीने आरटीपीसीआर करून घ्यावे. काही तांत्रिक त्रुटीमुळे अँटिजनचा अहवाल चुकू शकतो.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
कोट
शासकीय आरोग्य विभागाकडून अँटिजन तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संशय आला. त्यामुळे आरटीपीसीआर करून घेतले. याचा अहवाल निगेटिव्ह आला. असे झाल्याने अँटिजनसंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे.
एक रुग्ण