नवउद्योग निर्माण होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2015 12:24 AM2015-12-14T00:24:56+5:302015-12-14T00:52:24+5:30
कांचनताई परुळेकर : ‘कौशल्य विकास’ विषयावर कार्यशाळा
कोल्हापूर : युवकांनी स्वयंरोजगार कौशल्य व सृजनशीलता आत्मसात करणे आवश्यक आहे. केवळ रोजगाराभिमुख युवकांची निर्मि$ती करणे काळाची गरज नसून, नवउद्योग निर्माण होणे आवश्यकआहे, असे प्रतिपादन स्वयंसिद्ध संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन व कौशल्य सृजनता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौशल्य विकास’ या विषयावर मानव्यशास्त्र सभागृहात एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे बीसीयूडीचे संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे उपस्थित होते. याप्रसंगी तेज कुरिअरच्या कार्यकारी संचालिका साधना घाटगे उपस्थित होत्या.युवकांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि सृजनशिलता या संदर्भात प्रोत्साहित करण्यासाठी या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परुळेकर म्हणाल्या, नवभारताच्या उभारणीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी विद्यापीठ आणि स्वयंरोजगार संस्थांनी संयुक्तरीत्या जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.नवउद्योजिका, तेज कुरिअरच्या कार्यकारी संचालिका साधना घाटगे म्हणाल्या की, आधुनिक स्त्री ही अबला नसून, सबला आहे हे अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी सिद्ध केले आहे, म्हणून स्त्रियांनी आपले स्वकर्तृत्व जाणून उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी. स्त्रियांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून विकासाच्या नव्या पर्वात सहभागी व्हावे. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे म्हणाले की, विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या तीन लाख युवकांना स्वयंरोजगार व कौशल्य विकास अंतर्गत समावेश करण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र दालन उभे केले आहे. २०२० पर्यंत कौशल्याभिमुख युवकांची मोठी निर्मिती भारतामध्ये होणार आहे. या युवकांना जागतिक व्यासपीठ खुले असणार आहे. याकामी शिवाजी विद्यापीठाचे कार्य भारतात अग्रस्थानी राहील, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या समन्वयिका प्रा. डॉ. वासंती रासम म्हणाल्या, महाराष्ट्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचे अध्ययन, संशोधन नव्याने करणे व समाजातील स्त्रियांमध्ये आत्मभान व स्वयंसिद्धता निर्माण करण्याचे कार्य अध्यासनात सातत्याने केले जाते.डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी आभार, तर सागर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. याप्रंसगी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
( प्रतिनिधी )